सध्या गाजत असलेल्या आयएएस पूजा खेडकर (IA Puja Khedkar) प्रकरणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत (UPSC) लोकांच्या मनात असलेल्या भावनेला तडा गेला आहे. यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी यूपीएससी काही महत्वाची पावले उचलणार आहे. परीक्षा आणि त्यानंतर निवडीमधील फसवणूक रोखण्यासाठी यूपीएससी नवीन तंत्रज्ञानासह, आपली परीक्षा प्रणाली सुधारणार आहे.
पूजा खेडकर वाद आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये (NEET) फसवणुकीच्या अलीकडील प्रकरणांनंतर, केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये उमेदवारांसाठी अत्याधुनिक आधार-आधारित फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि फेशियल रेकग्निशन समाविष्ट करण्याची आयोगाची योजना आहे.
परीक्षेदरम्यान होणारी फसवणूक आणि कॉपी रोखण्यासाठी क्लोज सर्किट टेलिव्हिजनद्वारे (CCTV) पाळत ठेवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग यांसारखे तांत्रिक उपायही आखले जात आहेत. यूपीएससी दरवर्षी 14 परीक्षा घेते, ज्यात नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि उच्च सरकारी पदांसाठी अनेक भरती चाचण्या आणि मुलाखती यांचा समावेश होतो. अहवालानुसार, यूपीएससी ज्या परीक्षा घेते त्यामध्ये तांत्रिक सेवा देण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
यूपीएससीने सांगितले की, ते परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा केंद्रांची यादी आणि उमेदवारांची संख्या यासारखी माहिती परीक्षेच्या 2-3 आठवड्यांपूर्वी सेवा प्रदात्यांना देईल, जेणेकरून तयारी करता येईल. उमेदवारांचे तपशील (नाव, रोल नंबर, फोटो इ.) परीक्षेच्या 7 दिवस आधी, फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि फेशियल रेकग्निशनमध्ये वापरण्यासाठी प्रदान केले जातील. (हेही वाचा; IAS Puja Khedkar Missing? आयएएस पूजा खेडकर FIR नंतर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता; मसुरीतील UPSC प्रशिक्षण केंद्रातही पोहोचली नाही)
दरम्यान, महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी पूजा खेडकर अनेक कारणांमुळे वादात आहे. प्रशिक्षणादरम्यान कार, निवास आणि स्वतंत्र खोलीची मागणी करून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. नंतर तिने बनावट प्रमाणपत्रेही बनवल्याचे उघड झाले. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असूनही, तिने मागासवर्गीय नॉन क्रिमी लेयर श्रेणीत परीक्षा दिल्याचेही उघड झाले आहे. वादानंतर तिचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे व सध्या ती गायब आहे.