Probationary IAS Officer Puja Khedkar (PC - X/@Normal_2610)

वादात सापडलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (Puja Khedkar) वाशिम येथील प्रशिक्षण केंद्र सरकारने रद्द केले होते. त्यानंतर पूजाला 23 जुलैपर्यंत मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ॲकॅडमी (LBSNAA) येथे बोलावण्यात आले. मात्र ती बुधवार (24 जुलै) पर्यंतही तेथे पोहोचली नाही. टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पूजाने सांगितले की, ती वैयक्तिक कारणांमुळे अकादमीत पोहोचू शकली नाही. पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अकादमीतील उपस्थित सूत्रांनी सांगितले.

मात्र काही अहवाल असेही सांगतात की, पूजा खेडकर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. पूजा खेडकर कुठे आहे याची कोणालाच कल्पना नाही. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर पूजा खेडकर बेपत्ता आहे. पूजा विरोधात गेल्या आठवड्यात दिल्लीत खोटी माहिती आणि तथ्ये सांगितल्याच्या आरोपाखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनियन लोकसेवा आयोगाने (UPSC) 2022 च्या परीक्षेसाठी तिची उमेदवारी रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे आणि भविष्यातील परीक्षांपासून तिला काढून टाकण्याचा विचार केला जात आहे.

वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकरच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती देण्याचे निर्देश केंद्राने पुणे पोलिसांना दिले आहेत. केंद्राने पूजा खेडकरने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. पूजावर तिच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती लपवून ओबीसी नॉन क्रीमी लेयर कोट्याचा फायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (हेही वाचा: Indrani Mukerjee: इंद्राणी मुखर्जीच्या युरोपवारीवर हायकोर्टाची स्थगिती; आरोपी पळून जाण्याचा सीबीआयचा युक्तिवाद)

दरम्यान, पुण्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पूजाबद्दल मुख्य सचिवांकडे तक्रार केल्यानंतर, पूजा खेडकरचे प्रकरण पहिल्यांदा समोर आले. तक्रारीनुसार, पूजाने व्हीआयपी ट्रीटमेंटची मागणी केली होती. तिने अधिकाऱ्यांना त्रास दिला, यासह आपल्या वैयक्तिक गाडीवर लाल-निळा दिवाही लावला. यानंतर तिची वाशिम येथे बदली करण्यात आली. त्यानंतर तिच्याविरुद्ध आणखीन खुलासे समोर येऊ लागले. तिचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी कोट्याचा वापर यांवर प्रश्न उपस्थित झाले. यापूर्वी पोलिसांनी पूजा खेडकरच्या आईलाही अटक करण्यात आली आहे.