Agniveer Recruitment 2023: उमेदवारांची निम्मी फी भरणार भारतीय सेना; अभ्यासक्रम कोणताही बदल नाही; ऑनलाइन घेण्यात येणार परीक्षा
Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Agniveer Recruitment 2023: अग्निवीर भरती परीक्षा ऑनलाइन असेल, मात्र अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नाही. भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. साऊथ ब्लॉक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल एनएस सरना म्हणाले की, तरुण तंत्रज्ञानाचे जाणकार आहेत आणि मोबाईल फोनचा वापर अगदी खेड्यापाड्यातही पोहोचला आहे. अलीकडेच लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले होते. आता उमेदवाराला प्रथम ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) द्यावी लागेल. यानंतर शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.

सरना यांनी पुढे सांगितलं की, स्क्रिनिंग प्रक्रियेसाठी पूर्वी उमेदवारांना लांब रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु, आता भरती प्रक्रियेतील बदल संभाव्य उमेदवारांना मदत करेल आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभतेमुळे लष्कर अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकेल. (हेही वाचा -Maharashtra CET 2023: MBA/MMS Entrance Exams साठी रजिस्ट्रेशन सुरू; पहा परीक्षेच्या तारखा)

लष्कराने अलीकडेच अग्निवीर आणि इतरांसाठी भरती प्रक्रियेत सुधारणा करत अधिसूचना जारी केली होती. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली होती की, सैन्याने कनिष्ठ आयोग अधिकारी/इतर रँक/अग्निवीर यांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा जाहीर केल्या आहेत.

16 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत अग्निवीर भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतील. उमेदवार वय, शैक्षणिक पात्रता, शारीरिक दर्जा आणि इतर पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरती मेळाव्यापूर्वी उमेदवारांसाठी ऑनलाइन CEE परीक्षा घेतली जाईल. दरम्यान, लेफ्टनंट जनरल सरना यांनी स्पष्ट केलं की, अभ्यासक्रम किंवा परीक्षेच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यावेळी केवळ शेवटची परीक्षा ऑनलाइन करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी माहिती दिली होती की संगणक-आधारित ऑनलाइन सीईई 17 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरातील 175 ते 180 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्याची योजना आहे. लेफ्टनंट जनरल सरना म्हणाले की, 10 वी नंतर दोन वर्षांच्या आयटीआय पदवीधारक, एनसीसीचे ए, बी, सी प्रमाणपत्र आणि डिप्लोमा धारकांना बोनस गुण दिले जातील. ऑनलाइन सीईई परीक्षेची फी 500 रुपये आहे. या प्रकरणात, सेना 50 टक्के भरेल आणि उमेदवारांना फक्त 250 रुपये भरावे लागतील.