Summer Exams: आगामी उन्हाळी परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण; सीएम उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

गेले अनेक महिने राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. परंतु आता उद्यापासून राज्यातील कोरोना निर्बंध हटत असल्याने येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन (Offline Exams) होण्याची दाट शक्यता आहे. परंतु आगामी उन्हाळी परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने उन्हाळी परीक्षांचा निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीची दखल न घेता सर्व विद्यापीठांवर सोपविला असून, विद्यापीठे मनमानी कारभार करीत आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

उन्हाळी परीक्षांचे बहुतांश अभ्यासक्रम हे ऑनलाइन शिकवले जात असून, अशी ऑफलाइन परीक्षा घेतल्यास त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल, अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की, ऑफलाइन परीक्षांचा अभ्यास करत असताना असाइनमेंट, मिनी-प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल आणि इतर कामे 1 किंवा 2 महिन्यांत पूर्ण करणे कठीण आहे. शिवाय, अभ्यासासाठी इतका कमी वेळ असतानाही अभ्यासक्रमात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अनेक वसतिगृहे अजूनही बंद आहेत. याबाबतचे पत्र विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिले आहे.

महाराष्ट्र विद्यार्थी कल्याण संघाचे अध्यक्ष, वैभव एडके म्हणाले, ‘आम्हाला विद्यार्थ्यांकडून हजारो संदेश येत आहेत. ते अत्यंत असमाधानी आणि त्यांच्या भविष्यातील करिअरबद्दल चिंतित आहेत. प्रत्येकजण ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल बोलत आहे, परंतु अपूर्ण अभ्यासक्रम, निवास, प्रवास, लसीकरण आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल कोणीही बोलत नाही. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा एकसमान पद्धतीने घेतल्या पाहिजेत. आम्ही राज्य सरकारच्या उत्तराची वाट पाहू अन्यथा आम्ही घटनात्मक आंदोलन करू.’ (हेही वाचा: SSC HSC Results Update: 10 वी आणि 12 वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता? मंडळाने दिले स्पष्टीकरण)

परीक्षेची पद्धत विद्यापीठाद्वारे निश्चित केली जात असल्याने, जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देतील ते ऑफलाइन परीक्षा देणाऱ्यांपेक्षा चांगले प्रदर्शन करतील याची चिंता विद्यार्थ्यांना वाटत आहे. हा आपल्यावर अन्याय होईल, असा त्यांचा विश्वास आहे. मुंबई विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘आमच्या कॉलेजने आम्हाला सध्या ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यास सांगितले आहे. परंतु आमच्या महाविद्यालयात वसतिगृह नसल्याने आम्हा बाहेरच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या निवासाची व्यवस्था पाहणे आवश्यक आहे, जी अत्यंत महाग आहे. या सर्व गोष्टींसह आम्हाला आमच्या असाइनमेंट, प्रॅक्टिकल आणि अभ्यास चालू ठेवणे कठीण जात आहे.’