SSC HSC Results Update: 10 वी आणि 12 वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता? मंडळाने दिले स्पष्टीकरण
Result (Photo Credits: Facebook)

गेल्या काही दिवसांमध्ये, शिक्षक मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकांचे बंडल स्वीकारण्यास नकार देत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10, 12 वीच्या परीक्षेचे (HSC and SSC) निकाल उशीरा लागतील, अशा बातम्या समोर आल्या होत्या. एका अहवालात म्हटले होते, ‘राज्य मंडळाच्या उत्तरपत्रिका राज्यभरातील 25 हजार शिक्षकांनी परत केल्या आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्ट ऑफिसमध्ये तसेच पडून आहेत, त्यामुळे 10 वी आणि 12 वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.’

परंतु अशा अहवालांमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. दिशाभूल करणाऱ्या अहवालांवर स्पष्टीकरण देताना, महाराष्ट्र विभाग मंडळाने बुधवार, 30 मार्च रोजी 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबतच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने असेही स्पष्ट केले आहे की, इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी नाकारल्या नाहीत आणि पोस्ट ऑफिस किंवा बोर्डाकडे परत केल्याही नाहीत.

याबाबतचे एका फोटो प्रकाशित झाला होता ज्यामध्ये दिसत होते की, पोस्ट ऑफिसमध्ये उत्तरपत्रिका तशाच पडून आहेत. यावर मंडळाने म्हटले आहे की, वृत्तपत्रात आलेले छायाचित्र कोणत्याही पोस्ट ऑफिसमधील नाही. मूलतः गठ्ठे बंदिस्त कापडी पिशवीत पाठवले गेले होते आणि ते कधीही तसेच उघडले गेले नाहीत.’ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च विभागाचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा: आदित्य ठाकरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला, म्हणाले- राजकारणापासून दूर राहा, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा)

परिपत्रकात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘हा फोटो पोस्ट ऑफिस किंवा माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील नाही. हा फोटो दिशाभूल करणारा आहे.’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोस्ट ऑफिस गेल्या दोन दिवसांपासून संपावर असून, त्यामुळे उत्तरपत्रिका वाटण्यात तात्पुरता विलंब होत आहे. जेव्हापासून पोस्ट ऑफिसचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून, उत्तरपत्रिकांचे वितरण सुरळीत सुरू आहे. सोशल मीडियाच्या रिपोर्टवर कोणीही अवलंबून राहू नये.