MSRTC Recruitment 2019: एसटी बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हातात; प्रशिक्षित 150 महिला बस चालक लवकरच सेवेत, 'मरापम'चा अभिनव निर्णय
MSRTC | (Photo Credit: Archived, edited, representative images)

MSRTC Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एक अभिनव निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता यापुढे एसटी बस चालक म्हणून केवळ पुरुषच नव्हे तर, महिलाही दिसणार आहेत. थोडक्यात काय तर या पुढे एसटी बसचे स्टेअरिंग आता महिलांच्याही हातात येणार आहे. राज्य परिवहन विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यात बसचालक (Women Bus Drivers) म्हणून 150 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या महिला उमेदवारांचे येत्या ऑगस्ट महिन्यापासून प्रशिक्षण सुरु होणार असून, हे प्रशिक्षण एक वर्षभर चालणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिला उमेदवार सेवेत दाखल होतील.

प्राप्त माहितीनुसार, सध्या सुरु असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या भरती प्रक्रियेत महिला चालकांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बस चालक पदासाठी महिला उमेदवारांकडून अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी भरती प्रक्रियेच्या काही अटींमध्ये बदल करण्यात आले आहेत. या आधी बस चालक पदावर काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना तसेच, तीन वर्षे प्रत्यक्ष वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक अशी अट होती. मात्र, ही अट महिला उमेदवारांसाठी शिथील करुन आता त्यात अवजड ऐवजी हलकी वाहने चालविण्याचा परवाना अशी करण्यात आली. या अटींची पूर्तता होत असलेल्या काही महिलांनी अर्ज केले. त्यातील काही महिला उमेदवारांची निवड करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, महामंडळाने आलेल्या अर्जांपैकी सर्व अटी आणि कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केलेल्या 150 महिला उमेदवारांची चालक, वाहक पदासाठी निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर या महिला सेवेत रुजू होतील. सेवेत दाखल झालेल्या महिला बस चालकांना सुरुवातीस कार्यालयांपासून (डेपो) अगदी नजिकच्या अंतरावर असलेल्या आणि छोट्या अंतरांच्या मार्गावर एसटी बस चालविण्याचा अनुभव दिला जाईल त्यानंतर या अंतरात थोडी थोडी वाढ करत त्यांना दीर्घ पल्ल्यांच्या बस चालविण्यास नियुक्त केले जाईल. (हेही वाचा, महाराष्ट्र जलसंपदा विभागात ज्युनिअर सिव्हिल इंजिनीअर पदासाठी भरती सुरू; 15 ऑगस्ट पर्यंत करू शकाल अर्ज)

दरम्यान, राज्यपरिवहन विभागामार्फत आदिवासी तरुणींना वाहन चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. 'वाहन चालक प्रशिक्षण योजनें'तर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत 21 आदिवासी तरुणींना एटटी महामंडळातर्फे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजते.