महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य सेवा प्रिलिम्सची परीक्षा 21 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती, मात्र 11 मार्च रोजी पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक बदलले. मदत व पुनर्वसन विभागाने एका परिपत्रकात जाहीर केलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर 12 मार्च रोजी आयोगाकडून कळविण्यात आले की 21 मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असताना ही परीक्षा होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी परीक्षा दिशानिर्देश जारी केले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे-
- परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
- कोरोना विषाणूसदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना आगाऊ कळवावे.
- अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.
- शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
- परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
- वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्येच टाकावेत.
- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.
- शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे. (हेही वाचा: SSC and HSC Class Syllabus: अभ्यासक्रमात 50% कपात करावी यासाठी इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी आक्रमक)
दरम्यान, 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना आधीच प्रवेशपत्रे देण्यात आली होती. मात्र परीक्षेची तारीख बदलल्यानंतर आयोगाने म्हटले होते की, परीक्षा 21 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर त्याच केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी आधीच मिळालेले हॉल तिकीट हे 21 मार्चच्या परीक्षेला वैध मानले जाईल.