
राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या वाढत असताना शैक्षणिक वर्तुळातून विविध परीक्षांचे आयोजन केले जात आहे. यात दहावी, बारावी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे. या दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेगळीच मागणी केली आहे. इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षांसाठी असलेला अभ्यासक्रम 50% कमी करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. लातूर विभागातील विद्यार्थ्यांनी आज ही मागणी केली. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी शहरांमध्ये वाढत असलेली कोरोना संक्रमितांची संख्या विचारात घेऊन ही मागणी केली जात आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासही पुरेसा झाला नसल्याचे बोलले जात आहे.
यंदा शैक्षणिक वर्षात कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला. शाळा, विद्यालये तर बंदच होती. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडला. परंतू, यात सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारता आला नाही. अनेकांना आर्थिक अडचणींची मर्यादा पडली. काहींना नेटवर्कची समस्या आली. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, SSC, HSC Exam 2021 ठरलेल्या वेळेतच होणार; अफवांना बळी न पडण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन)
दरम्यान, काही विद्यार्थी पालकांनी म्हटले आहे की, कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासही विलंब लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातही सवलत मिळावी. कोरोना काळात राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे हे निर्बंध पाळून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी परीक्षा मंडळ अध्यक्षांना निवेदन दिले. आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन इयत्ता 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करावा, असे म्हटले आहे.