देशात मागच्यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर शासनाने देशातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र त्याचेवेळी देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने 15 एप्रिल 2021 पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे व त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. यासोबतच आता राज्यातील शाळादेखील सुरु केल्या जाणार आहेत. मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
म्हणूनच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत सरकार विचाराधीन होते. त्यानुसार आता 17 ऑगस्ट, 2021 पासून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, 2 ऑगस्ट 2021 च्या ‘ब्रेक द चेन’ मधील सुधारित मार्गदर्शक सचूनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय़ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
शाळा सुरु करण्यासाठी सरकारने पुढील मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत-
- शाळा सुरू करण्यापूर्वी संबधित शहरात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
- सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले असावे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे लसीकरणाचे नियोजन करावे. गर्दी टाळण्यासाठी पालकांनी शाळेच्या परिसरात येऊ नये.
- जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात वर्ग भरवावे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर ठेवावे. एक वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थांना घरी पाठवून लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
- विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्यांना वेगळे ठेवावे.
- मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेल बोलवावे.
- शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शाळेत/शहरात करावी. त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहनाचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. (हेही वाचा: Mumbai University UG Course: युजीच्या प्रवेशासाठी 17 ऑगस्टला मुंबई विद्यापीठ करणार पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कशी पाहता येणार?)
तर अशाप्रकारे ज्या महापालिकेत शाळा सुरू करणे शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागात करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील.