Maharashtra Colleges Update: शाळांनंतर आता राज्यातील कॉलेजेस देखील लवकरच सुरु होणार; जाणून घ्या काय म्हणाले Minister Uday Samant
Uday Samant | (File Photo)

 

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा विभाग लवकरच राज्यातील महाविद्यालये (Maharashtra Colleges) पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संमतीसाठी पाठवणार आहे. विविध संघटना आणि शिक्षण तज्ञांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून विभागाने हा निर्णय घेतला आहे. ‘राज्यात महाविद्यालये सुरू करण्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला जाईल,’ असे सामंत म्हणाले. राज्यातील अ-कृषी आणि तांत्रिक विद्यापीठांची महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, असे त्यांनी जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामंत यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. राज्यातील डीम्ड, खासगी आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनाही तो लागू असेल, असेही त्यांनी सांगितले होते. सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महाविद्यालये ऑनलाइन परीक्षा घेणार आहेत. सर्व विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे मान्य केले आहे.

सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे, जर विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला बसू शकत नसतील, तर त्यांनी काळजी करू नये कारण त्यांना परीक्षेची आणखी एक संधी दिली जाईल जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. शिवाय, जर विद्यार्थ्यांना महामारीमुळे संसर्ग झाला असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विषाणूची लागण झाली असल्याने जर का ते परीक्षेला बसू शकले नसतील, तर अशा विद्यार्थ्यांनाही आणखी एक संधी दिली जाणार आहे. (हेही वाचा: Schools Reopening in Maharashtra Update: 24 जानेवारी पासून राज्यात शाळा 'ऑफलाईन' सुरू करण्याला शासनाची परवानगी; पालकांची संमती आवश्यक)

विद्यार्थ्यांना आगाऊ सूचना देऊन विविध महाविद्यालयांशी संलग्न सर्व वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचेही मंत्र्यांनी जाहीर केले होते. ही वसतिगृहे विशिष्ट कालावधीसाठी बंद राहतील आणि विद्यापीठे त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करतील. मात्र, परदेशातील विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृहे बंद केली जाणार नाहीत.