Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

ओमिक्रॉनच्या (Omicron) दहशतीखाली बंद करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत काल शालेय विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता त्यावर शासनाने याला हिरवा कंदील देत मुलांसाठी शाळेचे दरवाजे उघडले आहे. मात्र हा निर्णय सरसकट शाळा सुरू करण्याचा नसेल. सरकारने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. यामध्ये जेथे रूग्णसंख्या कमी आहे आणि स्थिती आटोक्यात आहे, कोविड 19 नियमावलीचं पालन करता येईल अशा ठिकाणी 1ली ते 12वीसोबतच शिशू वर्ग देखील सुरू करण्याला परवानगी असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची अनुमती आवश्यक असणार आहे. तसेच 15-18 वयोगटातील मुलांचं शाळेत येऊन लसीकरण करून घेण्यासाठी देखील शालेय विभाग आरोग्य विभागाकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती दिली आहे. पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच नियमावली असणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण केलेले असावे असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालयं पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार प्रस्ताव .

ग्रामीण भागात इंटरनेट, वीज  यांची 24 तास अखंडीत सेवा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी, पालक यांच्याकडून वारंवार ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती.  त्यापार्श्वभूमीवर शिक्षण थांबू नये म्हणून मुलांसाठी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन वर्ग देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला असला तरीही राज्यात वाढणारी कोरोनारूग्ण संख्या चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात काल 443,697 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांच्या तुलनेत नव्या रूग्णसंख्येत 10% वाढ नोंदवण्यात आली आहे. तर 214 नवे ओमिक्रॉन रूग्ण देखील समोर आले आहेत. दुर्दैवाने यामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून 46,591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.