International Literacy Day 2019: उच्चशिक्षीत निरक्षरांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा!

Best Wishes For Educated Illiterate People: शिर्षक वाचून अनेकांना कदाचित धक्का बसला असेल. पण, हे शिर्षक का दिले याचा उलघडा करुन घेण्यासाठी काही गोष्टी नक्कीच विचारात घ्याव्या लागतील. परंतू, त्यापूर्वी भारतातील तमाम उच्चशिक्षीत निरक्षरांना (Educated Illiterate People) साक्षरता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 8 सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी (8 सप्टेंबर) जागतिक साक्षरता दिन (International Literacy Day) साजरा केला जातो. खरं म्हणजे हा साक्षरता दिन साजरा करण्याचा उद्देश जगभरातील निरक्षरता कमी करणे असा आहे. पण, जी मंडळी उच्चशिक्षण घेऊनही आडाण्यासारखे वागतात. अशा उच्चशिक्षीत निरक्षरांना कसे साक्षर करायचे? अशा उच्चशिक्षीत निरक्षरांना साक्षरता प्राप्त व्हावी. यासाठीच हा सगळा प्रपंच.

'जे जे आपणांसी ठावे ते इतरांना सांगावे, शहाने करुन सोडावे सकळजन' हे वचन संतांना सांगितल्याला आता अनेक वर्षे लोटली. पण, आपल्यात फरक काय पडला? काही नाही. अर्थात सर्वच साक्षर मंडळी निरक्षर होऊन वागत नाहीत. अपवाद नक्कीच आहेत. पण, ते केवळ अपवाद म्हणूनच. असो.

घासून मिळवलेल्या यशात सुखी नसणाऱ्यांना शुभेच्छा!

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहायला मिळतात. जे कष्टाने मिळवलेल्या यशात सुखी नसतात. जसे की, अनेक मंडळी संघर्ष करुन यशस्वी होता, मोठा हुद्दा मिळवतात. पण, काही काळाने ते स्वत:ला दोष देतात उगाच या क्षेत्रात आलो. दुसऱ्या क्षेत्रात गेलो असतो तर बरे झाले असते. संघर्ष करताना माणूस नेहमीच काहीतरी शिकत असतो. आता इतका संघर्ष करुन तुम्ही पुढे आल्यानंतर स्वत:ला दोष देण्यात काय हाशील. याउलट अधिक संघर्ष करुन आपले स्थान भक्कम करणे कधीही चांगले. त्यामुळे अशा मंडळींनी आता तरी स्वत:ला साक्षर करावे यासाठी शुभेच्छा.

नियम वाचूनही तो मोडणाऱ्यांना शुभेच्छा!

इथे कचरा टाकू नये, वाहतुकीचे नियम मोडून नये, शांतता हवी असलेल्या परिसरात, घटनास्थळी मोबाईल शांत मोडवर ठेवावा, असे साधे नियम वाचूनही ते मोडणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता तरी सुधारा! वाचता येते याचा अर्थ त्या व्यक्तीला अक्षर ओळख आहे. याचाच अर्थ तो साक्षर आहे हे नक्की. पण, अशी साक्षरता काय कामाची. लिहीता वाचता येते पण वास्तवात आचरणात मुळीच आणता येत नाही. तर, मग अशा मंडळींना साक्षर कसे म्हणायचे?

बालकमगारांना कामावर ठेवणाऱ्यांना शुभेच्छा!

बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहित असूनही जे शिक्षित लोक आपल्या घरी, व्यावसायाच्या ठिकाणी तसेच, इतर कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवतात अशा लोकांना साक्षरतेचा अर्थ समजणे गरजेचे आहे. कारण या मुलांच्या शालेय शिक्षणाचा वेळ ते वाया घालवत असतात. केवळ लिहिता वाचता येणे म्हणजेच साक्षर होणे नव्हे. तर, त्यासोबतच शहाणपण येणे हिसुद्धा एक साक्षरताच आहे. अशा शहाणपण नसलेल्या शिक्षित निरक्षरांना साक्षर होण्यासाठी शुभेच्छा.

आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन अज्ञानी लोकांना लुटणाऱ्यांना शुभेच्छा!

आपला व्यवसाय, नोकरी, काम आदी ठिकाणी प्रामाणीक राहिन अशी शपथ घेऊनही लोक अप्रामाणीक राहतात. अनेक डॉक्टर, वकील, सरकारी कर्मचारी, महसूल आदी ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर असलेली मंडळी आपल्या ज्ञानाच्या जोरावर पीडितांना फसवत असल्याचे समोर येते. या फसवणुकीतून भ्रष्टाचार जन्माला येतो. अशा भ्रष्ट लोकांच्या मनात चांगल्या विचारांची साक्षरता येवो यासाठी शुभेच्छा.

पगारासाठी शिकवणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा!

उच्चशिक्षणाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदांवर असलेल्या पण आपल्या कर्तव्यात कमी असलेल्या मंडळींनाही शुभेच्छा. विविध शाळांमध्ये अनेक शिक्षण ज्ञानदानाचे काम प्रामाणीकपणे करत असतात. परंतू, अशाही शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जे केवळ पगारासाठी शिकवतात. गलेलठ्ठ पगार घेऊनही त्यांच्या विषयात निकाल अनेकदा कमी लागतो. अनेकदा तो शून्यही लागतो. अशा कर्तव्यात कमी असलेल्या शिक्षकांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, विद्यार्थी कल्याणाची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी, हिच या शिक्षकांसाठी साक्षरता ठरेल. त्यासाठीच अशा शिक्षकांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा.

शिक्षणाचा उद्देश केवळ लिहिणे वाचणे असा कधीच नसतो. शिक्षणासोबत शहाणपण येणे, आपल्यासोबत इतरांचाही विकास होणे, त्यांच्या मनात परिवर्तनाची आस निर्माण होणे अपेक्षीत असते. शिक्षणाने माणूस केवळ शिक्षित नव्हे तर सुसंस्कृत बनविणे हिच खरी साक्षरता आहे. त्यामुळे साक्षरतेची कास धरताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सर्वांगीण होणे महत्त्वाचे असते. म्हणूनच त्याकडे डोळेझाक करुन चालणार नाही.