Representational Image (Photo Credit: unsplash.com)

देशभरात किमान 695 विद्यापीठे आणि 34,000 महाविद्यालये अशी आहेत, जी नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) च्या मान्यतेशिवाय चालू आहेत. केंद्राकडून संसदेत ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. एनएएसीचे काम देशात सध्या असलेल्या उच्च शिक्षण संस्थांचे (HEIs) मूल्यांकन करणे आणि त्यांना प्रमाणित करणे हे आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल.

परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एनएएसीचे प्रमाणपत्र नसणे ही चिंतेची बाब आहे. शिक्षण राज्यमंत्री म्हणाले, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मिळालेल्या माहितीनुसार, 1,113 विद्यापीठे आणि 43,796 महाविद्यालयांपैकी केवळ 418 विद्यापीठे आणि 9,062 महाविद्यालायांना एनएएसीची मान्यता देण्यात आली आहे.’

शिक्षण राज्यमंत्री म्हणाले, ‘सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालये मान्यता प्रणाली अंतर्गत आणण्यासाठी, एनएएसीने मूल्यांकन आणि संचमान्यतेसाठी शुल्क रचना लक्षणीयरीत्या कमी केली आहे.’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना त्यांच्या संस्थात्मक विकास योजनांद्वारे पुढील 15 वर्षांमध्ये उच्च स्तरावरील मान्यता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

विद्यापीठे आणि महाविद्यालयांची मान्यता एनएएसीद्वारे केली जाते, जी विद्यापीठ अनुदान आयोगाची आंतर-विद्यापीठ संस्था आहे. देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणे आणि त्यांना मानांकन देणे हे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे काम आहे. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार देशातील अनेक विद्यापीठे आणि कॉलेजेसना एनएएसीचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे इथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ तर चालू नाही ना, असा प्रश्न उभा राहत आहेत. (हेही वाचा: शैक्षणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली भारतामधील टॉप 10 शहरे; यादीत पुणे व मुंबईचा समावेश)

दरम्यान, भुवनेश्वरमधील एका डीम्ड विद्यापीठाने नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल स्कोअर 2022 मध्ये मधील भारतातील टॉप-रँकिंग विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला मागे टाकले आहे. या विद्यापीठाने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या 3.67 च्या तुलनेत 3.88 गुण मिळवले आहेत, जे देशातील आतापर्यंतचे सर्वोच्च आहेत.