शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नव्हती; दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
Sharad Pawar | (Photo Credits: twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जात असतो. या व्यक्तीच्या सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. परंतु, शरद पवारांना याबाबतीत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. (हेही वाचा - Republic Day Parade 2020 Live Streaming on Doordarshan and PIB India: आता घरबसल्या पहा दिल्लीच्या राजपथावरील 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण)

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांचे कर्मचारी सुरक्षारक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. मात्र, 20 जानेवारीच्या रात्रीपासून या सुरक्षारक्षकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता निवास्थानी कामावर येणे बंद केले. त्यानंतर दोन दिवसांनी हे सुरक्षारक्षक कामावर का पोहोचले नाहीत याबाबत चौकशी करण्यात आली.

सुरक्षारक्षक कामावर न आल्याने शरद पवार यांनी निवासस्थानी खासगी सुरक्षारक्षक तैनात केले होते. त्यानंतर शनिवारी दिल्ली पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण देताना शरद पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी पूर्वीप्रमाणेच तैनात असल्याचेही दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.