Coronavirus Cases In India: देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 96,982 रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1.26 कोटींवर गेली आहे. सप्टेंबरमध्ये कोविडच्या प्रकरणामध्ये घट झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, जेव्हा कोविड विरद्धची लढाई भारताने जिंकली आहे. परंतु, तरीदेखील इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची नेमकी कारण काय असू शकतात? आज या लेखातून भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागचे कारण जाणून घेऊयात. (वाचा - COVID-19 Vaccine Update: Covishield चा दुसरा डोस 2-3 महिन्यांनी दिल्यास 90% परिणामकता दिसू शकेल; Adar Poonawalla ची माहिती)
भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत का वाढ होत आहे?
मध्य प्रदेशातील इंदूर येथील कोविड कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रभारी डॉ. अनिल डोंगरे यांनी संवाद साधताना सांगितले की, कोरोना विषाणूला वाढण्यास अनुकूल वातावरण आवश्यक आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये तापमानात घट होते. हे वातावरण विषाणू वाढण्यास अनुकूल आहे. आता जसे तापमान पुन्हा वाढू लागले आहे, त्या बरोबरचं विषाणूचा प्रसार देखील वाढत आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे यूकेमधील कोविडचा नवीन स्ट्रेन. नागरिकांमध्ये यूकेमधील कोरोना स्ट्रेनची पुष्टी होत आहे. यातील अनेक रुग्णांनी कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा केला नव्हता. मात्र, या लोकांना वेगळ्या मार्गाने कोरोनाचा संसर्ग झाला. 100 लोकांच्या नमुन्यात 6 लोकांमध्ये यूके स्ट्रेनचा नमूना पाहायला मिळाला. ही आकडेवारी केवळ एका शहरापुरती मर्यादित आहे. देशपातळीवर ही संख्या जास्त असेल.
लोकांचे होणारे दुर्लक्ष हे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे एक कारण -
देशातील कोविड प्रकरणांमधील वाढ लक्षात घेता पंतप्रधानांनी बैठक बोलावली. यात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोना प्रकरण कमी झाल्यानंतर लोकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. यामुळे प्रकरणांमध्येही तेजी दिसून येत आहे. मास्क न घातल्यामुळे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न केल्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.
परिस्थितीवर कधीपर्यंत नियंत्रणात येईल?
डॉ. अनिल यांनी सांगितलं की, सध्याचे हवामान विषाणूच्या वाढीस अनुकूल आहे. म्हणून सध्या कोरोना प्रकरणे वाढताना दिसून येत आहेत. मे-जूनमध्ये तापमानात वाढ झाल्यावर पुन्हा त्यात घट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होईल.
काय केले पाहिजे?
तज्ज्ञांच्या मते, व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. मास्क योग्यरित्या लावणे, हात स्वच्छ ठेवणे तसेच मास्क लावताना आणि काढून टाकताना हातांची स्वच्छता घेणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, आवश्यक असल्यास घराबाहेर पडणे, आदी काळजी घेणे आवश्यक आहे.