आयआयटी-बॉम्बेच्या ताज्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कोविड कफ क्लाउड्सवर मास्कमुळे 7 ते 23 टक्के नियंत्रित मिळवले जाऊ शकते. मास्कमुळे कोविड संसर्ग रोखणं शक्य असून मास्क हा कोरोना विरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाची सामाजिक लस (Social Vaccine) आहे. आयआयटी बॉम्बेचे प्रोफेसर अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांनी सांगितलं की, कफ क्लाऊडद्वारे रूग्णाच्या तोंडातून सोडल्या जाणार्या SARS-CoV2 चे आकार आणि संख्या कमी करण्यासाठी केवळ मास्कचं नव्हे तर रुमालदेखील उपयुक्त आहे. यासंदर्भातील संशोधन अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या फिजिक्स ऑफ फ्लुइड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनात असं आढळून आलं आहे की, मास्क लावल्याने क्लाउड वॉल्यूमचे प्रमाण सात टक्के कमी होते. याशिवाय N-95 मास्क लावल्याने हे प्रमाण 23 टक्के कमी होते. डॉ. अग्रवाल म्हणाले की, "जेट सिद्धांताच्या आधारे विश्लेषण करताना आम्हाला आढळले की, कफ नंतरचे पहिले 5 ते 8 सेकंद हवेत ड्रॉपलेट पसरवण्यासाठी फार महत्वाचे असतात." (हेही वाचा -COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Bharat Biotech च्या Covaxin ला Phase 3 मानवी चाचण्यांसाठी परवानगी; देशात 10 राज्यांत होणार ट्रायल्स)
दरम्यान, डॉ भारद्वाज यांनी सांगितलं की, 'खोकला आल्यानंतर रुमालाचा वापर करणे किंवा कोपऱ्यांत खोकल्याने कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होते. अशा उपाययोजनांमुळे संसर्ग पसरण्याची शक्यता मर्यादित होते. आयआयटी-बॉम्बे येथील टीमने कफ क्लाऊडचे प्रमाण मोजण्यासाठी एक सूत्रही तयार केले आहे.
या सूत्राच्या मदतीने ते रुग्णालयातील वॉर्डातील जास्तीत जास्त लोकांची संख्या निर्धारित करण्यात मदत होते. हे सूत्र खोलीत, सिनेमा हॉलमध्ये, कारमध्ये किंवा विमानाच्या केबिनमध्ये प्रसारित हवेचा किमान दर राखण्यात मदत करते. यामुळे हवेतील ताजेपणा टिकवून राहतो आणि कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळते. दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून नागरिकांना मास्क घालण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहेत. मास्क घातल्याने हवेतील कोरोनाचा संसर्ग टाळणं काही प्रमाणात शक्य होऊ शकतं. आयआयटी बॉम्बेच्या संशोधनातूदेखील आता हे समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करणं कोरोना विरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.