COVID-19 2nd Peak: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह 'या' राज्यातील शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद
शाळा | प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

COVID-19 2nd Peak: देशातील अनेक राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातसह बर्‍याच राज्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग गेल्या एका वर्षापासून कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले होते. तब्बल एका वर्षानंतरही आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रासह बर्‍याच राज्यातील सरकारला मर्यादित लॉकडाउन आणि रात्रीचा कर्फ्यू लावण्यासारखे कठोर उपाय करावे लागले आहेत. दरम्यान, आता अनेक राज्यांनी कोविड- 19 प्रकरणे लक्षात घेऊन सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या 6 राज्यांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. याशिवाय इतर राज्यांमध्येही कोरोना प्रकरणात वाढ दिसून येत आहे. कोरोना साथीच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात विविध प्रकारची भीती निर्माण होऊ लागली आहे.

नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांतील लोक घाबरले आहेत. त्याचबरोबर अनेक राज्यात पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शाळा बंद करण्यात येत आहेत. गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्रातील शाळा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (वाचा - Coronavirus Vaccination: लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस निवडण्याचा पर्याय नाही; Covishield व Covaxin या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक- BMC)

महाराष्ट्र -

स्थानिक लॉकडाऊन नियमांनुसार, लॉकडाउन व निर्बंध असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. पुण्यातील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद आहेत. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, वसतिगृहे, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालवण्यास सांगितले आहे.

पंजाब -

पंजाबमधील सर्व शैक्षणिक संस्था 31 मार्चपर्यंत बंद राहतील. केवळ वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालये खुली राहतील. राज्यातील सर्वाधिक बाधित जिल्हे लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, अमृतसर, होशियारपूर, कपूरथला, एसबीएस नगर, फतेहगड साहिब, रोपार आणि मोगा आहेत. शुक्रवारी पंजाबमध्ये कोरोनाचे 2,490 नवीन रुग्ण आढळले.

गुजरात -

गुजरात सरकारने या आठवड्यात अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, सूरत, भावनगर, गांधीनगर, जामनगर आणि जुनागडमधील सर्व शाळांना 10 एप्रिलपर्यंत केवळ ऑनलाईन वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे. शहरांमधील कोचिंग क्लासेसही 10 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

पुडुचेरी -

पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशात 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 22 मार्च ते 31 मे दरम्यान बंद राहतील. त्याचबरोबर 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सोमवार ते शुक्रवार पाच दिवस चालू राहतील. यावेळी, कोरोना नियमांचे योग्य पालन केले जाईल.