बालाकोट हल्ल्यावेळी 300 फोन 'ऍक्टिव्ह'; टेक्निकल टीमने केला होता सर्व्हेलन्स, त्यानंतरच झाला हल्ला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट (Balakot) परिसरात एअर स्ट्राईक (Air Strike) केले. भारतीय लष्कराची ही फार महत्वाची कामगिरी समजली जाते. सरकारने या स्ट्राईकमध्ये तब्बल 300 दहशतवादी ठार झाले असल्याचे सांगितले. मात्र यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्ष आणि नरेंद्र मोदी विरोधी जनता, यांच्याकडून खरच यात 300 दहशतवादी ठार झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता ‘जैश-ए-मोहम्मद'च्या (Jaish-e-Mohammed) तळांवर हल्ला चढवण्याआधी त्या परिसरात 300 मोबाईल 'ऍक्टिव्ह' होते, असे गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या टेक्निकल सर्व्हेलन्स (Surveillance)मधून समोर आले आहे. याचाच अर्थ खरच या स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले असल्याच्या गोष्टीला आधार मिळत आहे.

सरकारच्या अनुमतीनंतरच हवाई दलाकडून अशा प्रकारचे सर्व्हेलन्स करण्यात आले होते. ‘द नॅशनल टेक्‍निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (NTRO) या संस्थेने या गोष्टीची पाहणी केली, पाहणी दरम्यान 300 फोन 'ऍक्टिव्ह' असल्याचे निदर्शनास आले. याचाच अर्थ त्याठिकाणी 300 दहशतवादी उपस्थित होते, त्यानंतरच भारतीय दलाकडून हा हल्ला करण्यात आला. यामध्ये सर्वच्या सर्व दहशतवादी ठार झाले असल्याचे भारत सरकारने सांगितले, मात्र याबाबतचा कोणता ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही. (हेही वाचा: एअर स्ट्राईकमध्ये जैशच्या चार इमारती आणि मदरसा उध्वस्त; SAR च्या सहाय्याने घेतलेले फोटो आहेत पुरावा)

26 फेब्रुवारीला मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालकोटवर जवळपास 1000 किलोंचे बॉंब फेकले. या हल्ल्यात ‘जैश’च्या इमारती जमीनदोस्त झाल्या. दरम्यान एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी, ‘टार्गेटवर मारा करणे आणि ते अचूक भेदले आहे की नाही, हे पाहणे आमचे काम आहे. बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले हे आम्ही मोजले नाही.’ असे स्पष्टीकरण दिले आहे.