मिसेस मुख्यमंत्री (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या संकटामुळे टीव्ही आणि चित्रपट सृष्टीला फार मोठा फटका बसला आहे. जवळजवळ 3 महिने शुटींग थांबल्याने नवीन मालिकांचे एपिसोड येणेही थांबले आहेत, परिणामी सध्या वाहिन्या जुन्याच मालिका दाखवत आहेत. अशात एक चांगली गोष्ट म्हणजे, साताऱ्यामध्ये झी मराठीच्या (Zee Marathi) 'मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs. Mukhyamantri) व ‘टोटल हुबलाक’ (Total Hublak) मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना नवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. सातारा (Satara) जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे.

सातारा जिल्हा हा पहिल्यापासूनच निर्माते-दिग्दर्शक यांच्यासाठी चित्रीकरणासाठी एक आकर्षित बिंदू ठरला आहे. अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांचे शुटींग या ठिकाणी होते. यानिमित्ताने फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होतो. यासोबतच वाहतूक आणि केटरिंगमध्येही स्थानिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतो. शुटींगच्या बदल्यात स्थानिक विकासाला मदत मिळते व या सर्वांसोबतच जिल्हा पर्यटनाचे आकर्षण बनतो. मात्र कोरोना विषाणूमुळे या सर्व गोष्टी थांबल्या होत्या.

आता या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे.

असे असतील नियम –

  • चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
  • चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
  • हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.
  • दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.
  • 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.
  • चित्रीकरणादरम्यान लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, सामूहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
  • केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तू वापरणे.
  • चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.
  • चित्रीकरणादरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

    अशाप्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणास परवानगी देऊन साताऱ्यात त्याची सुरुवात करणे, हा भारतातीला पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने, इथे पुन्हा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.