आर्ची-परश्याची  प्रेमकथा आता छोट्या पडद्यावर, सैराटचं मालिका स्वरूप जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला (watch video)
Jaat Na Pucho Prem Ki (Photo Credits: Instagram)

2016 ला प्रदर्शित झालेल्या सैराट (Sairat) सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतले सगळे पूर्व रेकॉर्डस् मोडून काढले. यासोबतच आर्ची परश्याची जोडी जगभरात गाजली. त्यानंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक' (Dhadak) ने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र अजूनही सैराटच्या चाहत्यांमध्ये क्रेझ कमी झालेलं नाही. या सर्व सैराट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सैराट सिनेमाचं मालिका स्वरूप लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं मुंबई मिरर च्या सूत्रांनुसार सांगण्यात येत आहे. & TV वर 'जात ना पूछो प्रेम की' ( Jaat Na Pucho Prem Ki) ही मालिका 18 जून पासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावेळेस कथानक उत्तर प्रदेशातील एका गावात घडणार असून किंशुक वैद्य (Kinshuk Vaidya) व प्रणाली सुरेश राठोड (Pranali Suresh Rathod) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जातीयवादाच्या विरोधात लढणारी ही प्रेमकथा सैराटच्या कथेवर आधारित असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात येतंय. दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच Sairat 2 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार

सैराटच्या कथेसोबत या सिनेमातील गाणी देखील सुपरहिट झाली होती, त्यामुळे या नव्या मालिकेचं शीर्षक गीत हे 'सैराट झालं जी' या गाण्यावर आधारित असणार आहे. या शीर्षक गीताचे बोल मनोज मुंटाशीर यांनी लिहिले असून यासाठी मूळ गाण्याचेच संगीत वापरण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेसाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 'जात ना पूछो प्रेम की'  प्रोमो (WATCH VIDEO)

सैराटवर आधारित मालिकेच्या चर्चांना दुजोरा देत अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ज्यात, 'सैराट ही प्रेमकथा समाजाच्या मुळात रुजलेल्या जातीय समजांवर भाष्य करणारी विलक्षण कलाकृती आहे असं मला असं वाटतं या चित्रपटातून मांडलेलं वास्तव प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपला संदेश घरोघरी पोहोचवायचा असेल तर टीव्हीसारखे दुसरं माध्यम नाही. त्यामुळे आम्ही सैराटवर आधारित मालिका बनवण्याचं ठरवलं.'अशी माहिती शंकर यांनी दिली होती.