Pavitra Rishta 2.0: सुशांतसिंह राजपूतनंतर आता Shaheer Sheikh साकारणार 'पवित्र रिश्ता 2'मध्ये मानवची भूमिका; डिजिटली होणार प्रसारण
Shaheer Sheikh (Photo Credit " Instagram)

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ही मालिका टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक मानली जाते. या सिरीयलमुळेच अर्चना म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि मानव म्हणजे सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हे रातोरात स्टार झाले होते. आता या मालिकेचा दुसरा सिझन ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2.0) येऊ घातला आहे. दुसऱ्या सिझनमध्येही अंकिता अर्चनाची भूमिका साकारत आहे, मात्र सुशांतच्या निधनानंतर मानवची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता होती. आता माहिती मिळत आहे की, शाहीर शेख (Shaheer Sheikh) मानवच्या भूमिकेत दिसणार आहे. कास्टिंग डायरेक्टर आदित्योआ सुरन्नाने याची पुष्टी केली आहे.

अहवालानुसार निर्माती एकता कपूर 'पवित्र रिश्ता 2.0’ संकल्पना आणि कथा फायनल करीत आहे. दुसरीकडे या सिरीयलची कास्टिंग सुरू आहे. वृत्तानुसार अभिनेता शाहीर शेखला 'पवित्र रिश्ता 2.0’ साठी साइन केले गेले आहे. शोमध्ये तो मानवची भूमिका साकारणार आहे तर अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

झूम डिजिटलशी बोलताना कास्टिंग डायरेक्टर आदित्योआ सुरन्ना म्हणाला, ‘पवित्र रिश्ता 2.0 पूर्णत: डिजिटल आहे. प्रत्येकासाठी हे एक आव्हान आहे. पहिल्या सीझनमधील अर्चना लोखंडे आणि उषा नाडकर्णी हे दुसऱ्या सिझनमध्येही असणार आहेत. इतरांची कास्टिंग अजूनही चालू आहे.’

एकता कपूर निर्मित, पवित्र रिश्ताz ने अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 1 जून 2009 रोजी या सीरिअलचा पहिला एपिसोड रिलिज झाला होता. 5 वर्षे ही मालिका चालली व 25 ऑक्टोबर 2014 रोजी त्याचा शेवटचा एपिसोड रिलीज झाला होता. 2013 मध्ये अभिषेक कपूरच्या 'का पो चे' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सुशांत शोमधून बाहेर पडला होता. सुशांतने शो सोडल्यानंतर हितेन तेजवानीने मानवची भूमिका साकारली होती.