Bigg Boss Marathi 2, 11 August, Episode 78 Updates: सलमान खानच्या उपस्थितीत रंगला वीकएंडचा डाव; अभिजित केळकर बिग बॉसच्या घरातून बाहेर
Bigg Boss Marathi 2, 11 August, Episode 78 Updates (Photo Credit : Colors Marathi)

आजच्या एपिसोडची सुरुवात अभिजित बिचुकले आणि त्यांच्या छोट्या मोठ्या करामती यांच्याबद्दलच्या चेष्टेने होते. महेश मांजरेकर बिचुकले यांचा लुक, त्यांचे बोलणे यावर टिपण्णी करतात त्याला बिचुकलेही मजेत उत्तरे देतात. त्यानंतर पुढे हीनाची शाळा सुरु होते. आपला केक गायब झाल्यावर ज्या प्रकारे हीनाने सीन क्रीएट केला होता, सदस्यांना प्रचंड ऐकवले होते त्याबद्दल तिची चूक समजावून सांगितली जाते. मात्र एका छोट्याश्या केकमुळे हीनाने ज्याप्रकारे वातावरण दुषित केले त्याचा राग प्रत्येक सदस्याच्या मनात आहे हा राग यावेळी बाहेर पडतो. परत बिचुकले या विषयावर बोलणे सुरु करतात आणि विषय भरकटतो.

त्यानंतर आजच्या वीकएंडच्या डावाचे सरप्राईज सलमान खान याची एन्ट्री होते. यावेळी महेश मांजरेकर पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करतात, पुढे त्यांच्या नव्या चित्रपटातील गाणे लॉंच केले जाते. यादरम्यान या गाण्याच्या केतकी माटेगावकरच्या आवाजातील 4 ओळीही ऐकवल्या जातात. हे झाल्यावर सलमान खान नक्की कसा आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला महेश मांजरेकर काही प्रश्न विचारतात. या दरम्यान मांजरेकर आणि सलमान काही जुन्या गोष्टींना आठवणींनाही उजाळा देतात.

त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना सलमान खानचे दर्शन दिले जाते. महेश मांजेरकर घरातील सर्व सदस्यांची सलमान खानशी ओळख करून देतात. त्यानंतर बिचुकले सलमान खान यांच्यावर रचलेली एक कविता सादर करतात. पुढे चित्रांवरून गाणे ओळखण्याचा खेळ सुरु होतो. इथे चित्रांमध्ये सर्व सलमानची गाणी लपवलेली आहेत. सदस्य एक एक करत ही ओळखतात व त्याच्यावर नृत्य करतात. यावेळी सर्वात पाहण्यासारखा ठरते ते बिचुकले आणि हीना यांचा ‘देखा है पहली बार’ गाण्यावरील नृत्य.

त्यानंतर महेश आणि सलमान दोघे एक खेळ खेळतात. यावेळी ते एकमेकांना काही कलाकारांचे फोटो दाखवून समोरच्याला अभिनय करत ते कलाकार कोण आहेत ते ओळखायचे आहे. अतिशय सफाईने दोघेही हे कलाकार ओळखतात. शेवटी घरातील सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन, काही सल्ले देऊन सलमान सर्वांचा निरोप घेतो.

अखेर या आठवड्यासाठी बिग बॉसच्या घरातून घरातून अभिजित केळकर बाहेर पडतो. अभिजित या घरातील सर्वात तगडा खेळाडू मनाला गेला होता, मात्र त्याच्या जाण्याने सर्वांनाच चटका बसला आहे. या गोष्टीचा सर्वात जास्त धक्का बसतो शिवला. आधी वैशाली आणि आता अभिजित बाहेर पडल्याने शिवचा फार मोठा आधार नाहीसा झाला आहे.