Hirkani Movie Review: आईच्या शौर्यगाथेची भव्यदिव्य मांडणी परंतु तितकंसं न भावलेलं दिग्दर्शन
Hirkani Movie Review (Photo Credits: File Image)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील एका शूर मातेची कहाणी म्हणजे हिरकणी. एका कवितेच्या माध्यमातून ती साऱ्यांनीच वाचली असेल परंतु त्याच छोट्याश्या कवितेला एक भव्यदिव्य स्वरूप देऊन लोकांपुढे एका चित्रपटाच्या रूपाने मांडण्याचं काम केलं आहे ते म्हणजे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी.

चित्रपटाच्या सुरुवातीला स्वराज्याचं दर्शन घडतं ते एका गाण्यातून. या गाण्याचं संपूर्ण चित्रण अप्रतिम करण्यात आलं असलं तरी ते जरा वाढतच गेल्यासारखं वाटू लागतं. त्यानंतर ओळख होते ती हिरोची. महाराजांच्या सैन्यातील एक मावळा म्हणजे जिवाजी. हा जीवा त्याची बायको (हिरा)आणि आईसोबत रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा वाडीत राहत असतो.

Hirkani Movie (Photo Credits: File Image)

पहिल्या भागात आपल्याला जीवा आणि हिरा मधील खुलणारी लव्ह स्टोरी पाहायला मिळते तर दुसऱ्या भागात आईच्या रूपातील हिराची आपल्या बाळासाठी असणारी काळजी तसेच बाळाला भेटण्यासाठी तिने दाखवलेल्या शौर्याचे दर्शन होते.

परंतु तिच्या शौर्याचं दर्शन काही अधिक काळ दाखवता आलं असतं तर चित्रपट अजून रंजक झाला असतं. रायगडावरील पश्चिम कडा हा जितका राकट आणि तितकंच जीवघेणा ही. त्यामुळे तो उतरवून खाली येणाऱ्या शूर मातेची खडतर कहाणी ही फारच वरवर दाखवण्यात आली असल्यासारखे वाटते.

Hirkani Movie (Photo Credits: File Image)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने हिराची भूमिका साकारली आहे. तिने या भूमिकेला नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न केलेला दिसून येतो. परंतु एक गावरान चेहरा या भूमिकेसाठी अजून साजेसा दिसला असता. अभिनेता अमित खेडेकर (Ameet Khedekar) याने मात्र जीवाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.

Hirkani Movie (Photo Credits: File Image)

संजय मेमाणे यांनी चित्रपटाचं छायाचित्रण अतिशय उत्तमरीत्या केलेलं आहे परंतु दिग्दर्शन मात्र काही अंशी तितकंसं भावलेलं दिसत नाही. कारण चित्रपटाचं कथानक हे आईच्या शौर्यावर आधारित असलं तरी त्यात बराच वेळ आपल्याला लव्ह स्टोरीच पाहायला मिळते. त्यामुळे हिरकणीचे शौर्य मात्र तितकेसे या सिनेमातून पोहचत नाही. चित्रपटातील व्हीएफएक्स इफेक्ट देखील बरे म्हणता येतील.

Hirkani Trailer: आपल्या तान्हुल्याच्या भेटीची ओढ लागलेल्या आईची धडपड आणि अंगावर काटा आणणारा तिचा असामान्य लढा दाखवणारा 'हिरकणी' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

'हिरकणी' हा चित्रपट उद्या (ऑक्टोबर 24) प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत जर एखादा मराठी सिनेमाच पाहायचा असेल तर हिरकणी त्यासाठी नक्कीच पर्याय ठरू शकतो. LatestLY मराठी प्रसाद ओक यांच्या 'हिरकणी' च्या रूपाने केलेल्या या एकूण प्रयोगाला देत आहे 3 स्टार्स.

Rating:3out of 5