चित्रपटसृष्टीमधील असे एक व्यक्तिमत्व जिच्या एका चेहऱ्यातून कैक भावना सहजा सहजी व्यक्त होत असत, अशी शालीनता जिथे लाजसुद्धा शरमेने चूर होत असे, ओठातून अलगद उतरणारं हास्य कित्येकांचा काळजाचा ठोका चुकवीत असे, तिच्या पाणीदार डोळ्यांची नजर नकळत आपल्याला तिच्याकडे आकर्षित करीत असे. उणेपुरे 31 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्रीने भलेही चित्रपटसृष्टीत जास्त काम केले नसावे, मात्र जे केले ते सर्व अमर झाले, म्हणूनच आजही तिचा अभिनय एक मार्गदर्शक म्हणून पहिला जातो. तर अशी ही हिंदी-मराठी कलात्मक चित्रपटसृष्टीवर राज्य करणारी अभिनेत्री स्मिता पाटील ! भारतीय समांतर चित्रपट स्मिता पाटीलच्या उल्लेखाशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. आज स्मिता जर का आपल्यात असती तर ती 64 वर्षांची झाली असती.
17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्मिताने दूरचित्रवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणून काम सुरु केले. असे सांगितले जाते त्याकाळी वृत्तनिवेदिका म्हणून काम करत असताना त्या जीन्स आणि टीशर्टवरच साडी परिधान करायच्या.
याच काळात शाम बेनेगल यांनी ‘चरणदास चोर’ या चित्रपटात स्मिताला पहिला ब्रेक दिला. या चित्रपटामधील स्मिता पाटील यांची छोटीशीच भूमिका लोकप्रिय ठरली. 1970-80 च्या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली. समाजातील अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. मुळात स्मिता या एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी कळवळा होता. म्हणूनच त्यांचा ओढा अशा कलात्मक चित्रपटांकडे जास्त होता. 1977 हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी त्यांचे `भूमिका` आणि `मंथन` हे दोन चित्रपट यशस्वी झाले होते. भूमिका चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेसाठी स्मिता यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. याच चित्रपटांमुळे स्मिता अभिनयाच्या बाबतीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. पुढे मिर्च मसाला, अर्थ अशा चित्रपटांमधून त्यांनी स्त्री प्रधान भूमिका केल्या. मंथन', 'आक्रोश', 'बाजार’, ‘मंडी’ हे स्मिता पाटील यांचे काही गाजलेले कलात्मक सिनेमे होय. समांतर चित्रपटांसोबतच त्यांनी केलेले 'शक्ती', 'नमक हलाल' यांसारखे व्यावसायिक चित्रपटदेखील सुपरहिट ठरले. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या. त्याकाळी अशी एकच अदाकारा इंडस्ट्रीमध्ये होती ती म्हणजे शबाना आझमी. साहजिकच या दोघींची बरीच तुलना झाली. दोघींमध्ये कमालीचे साम्य असूनही या दोघींमध्ये कधीच मैत्रीपूर्ण नाते निर्माण होऊ शकले नाही. या दोघींनी एकत्र निशांत, मंडी, अर्थ अशा चित्रपटांमधून काम केले.
सामना, जैत रे जैत, उंबरठा, सर्वसाक्षी हे स्मिता पाटील यांचे काही लोकप्रिय मराठी चित्रपट होय. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या तमाम मराठी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या गीताला अमर केले ते स्मिता पाटील यांनींच.
विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते. स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते. म्हणूनच चित्रपटसृष्टीमधील उत्तम अभिनेत्री कोण, असा उपस्थित झाल्यास आजही स्मिता पाटील यांचेच नाव डोळ्यासमोर येते.
फ्रान्समध्येला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता.
1982 मध्ये स्मिता आणि राज बब्बर यांनी ‘भीगी पलकें’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि पुढे जाऊन या दोघांनी लग्न केले. स्मिता पाटीलशी लग्न करण्यासाठी राज बब्बर यांनी आपल्या पहिल्या पत्नीचा त्याग केला. मात्र मुलाच्या बाळंतपणावेळी उद्भवलेल्या काही समस्यांमुळे प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांत स्मिता पाटील यांनी या जगाचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी काही कालावधी स्मिता आणि राज यांच्यामध्ये तणाव उद्भवला होता, यामुळे स्मिता थोड्याशा अलिप्त झाल्या होत्या. मात्र आपल्या मेकअप मनॅकडे त्यांनी ‘मृत्युनंतर त्यांच्या पार्थिवाला अगदी सुवासिनिसारखे सजवावे’ अशी विनंती व्यक्त केली होती. म्हणूनच नव्या नवरीसारखे नटवून स्मिता पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार, सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्येक अभिनेत्री जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, 'अशी स्मिता पाटील आता होणे नाही' हेच खरे.