लता मंगेशकरांचे कुटुंब (Photo Credit : Facebook)

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या दैवी आवाजाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. आज लता मंगेशकर यांचा 91 वा वाढदिवस (Lata Mangeshkar 91st Birthday) आहे. सध्या पार्श्वगायन क्षेत्रापासून लता मंगेशकर दूर गेलेल्या असल्या तरीही त्यांच्या आवजाची जादू आजच्या पिढीतील तरूण गायक-गायिकांना भुरळ पाडणारी आहे. त्यांच्या अनेक कलाकृती, गाणी ही आजही केवळ ऐकणं आणि त्याचा प्रयत्न करणं हा देखील रियाझाचा एक भाग मानला जातो. आयुष्यातला कोणताही प्रसंग असो किंवा विविध जातकुळीच्या नट्या असो, मराठी, बंगाली, हिंदी सह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये लता मंगेशकर यांच्या आवाजाने रसिकांना 100% आनंद आणि अभिनेत्रींना न्याय दिला आहे.

यशाच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनादेखील संघर्ष चुकला नाही. तावून सुलाखून निघाल्याशिवाय सोनं झळाळत नाही तसंच काही लता मंगेशकर यांच्याबद्दल आहे. आज 'भारतरत्न', 'भारताची गानकोकिळा' अशी बिरूदं जरी त्या मिरवत असल्या तरीही त्यांच्या बालपणातील आणि सुरूवातीच्या काळातील संघर्षाबद्दल जाणून घ्या.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं बालपण आणि संघर्षाचे दिवस कसे होते?

#1 लता मंगेशकर यांचे वडील गोव्याचे आणि आई महाराष्ट्रीय असली तरी त्यांचे सुरूवातीचे संगीत क्षेत्रातील शिक्षण हे गुजरातीमधील होते.  त्यानंतर त्या वयाच्या 5व्या वर्षी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासोबत संगीत नाटकात काम करण्यासाठी रंगमंचावर आल्या.

#2 लता मंगेशकर यांचे सांगितिक शिक्षण खूप लवकर सुरू झाले असले तरीही त्या शाळेत मात्र केवळ एकच दिवस गेल्या आहे. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी नूतन थिएटर्स साठी राग खंबावती आणि 2 मराठी गाणी सादर करत संगीत सेवा देण्यास सुरूवात केली. लता मंगेशकर केवळ 'पार्श्वगायिका' नव्हे तर 'या' क्षेत्रातही मातब्बर आहेत !

 

#3 लहान वयातच वडीलांचं छत्र हरवल्याने आई सह 4 भावंडांची जबाबदारी असलेल्या लता मंगेशकर यांना पार्श्वगायनाची संधी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. 1942 साली किती हसाल साठी पार्श्वगायन करण्यासाठी पहिली संधी मिळाली होती मात्र सिनेमातून ते गाणं वगळण्यात आलं.

#4 गुलाम हैदर यांनी 1948 साली लताबाईंचा आवाज निर्माते Sashaadhar Mukherjee यांना सुचवला होता. मात्र त्यांनी तो 'खूपच कोमल' असल्याचं सांगत नाकारला होता. त्यानंतर भविष्यात सारेच दिग्दर्शक, निर्माते त्यांच्याकडे गाणी गाऊन घेण्यासाठी ताटकळत राहतील असे भाकित केले होते.

#5 1948 साली अभिनेत्री मधुबाला यांच्या 'महाल' सिनेमात 'आएगा आनेवाला' हे गाणं सुपर डूपर हीट ठरलं आणि त्यानंतर लता मंगेशकर यांना कधीच मागे वळून पहावं लागलं नाही.

आजकाल गायक बनण्यासाठी, पार्श्वगायनाची संधी मिळवण्यासाठी अनेक शॉर्टकट्स वापरले जातात, रिएलिटी शोज कडे संधी म्हणून पाहिलं जातं. मात्र यासार्‍यांचा वापर केला तरी रियाझ आणि सातत्य याला पर्याय नाही. संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. तो चुकणारही नाही. मात्र साधनेलाच साध्य केलं तर हा प्रवास अधिक समृद्ध करणारा ठरू शकतो. हीच शिकवण लता मंगेशकर त्यांच्या सांगितीक प्रवासामधून देतात.