Puneeth Rajkumar Passes Away: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन, ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(Photo Credit - Instagram)

पुनीत यांना आज (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयच्या वृत्तानुसार, सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांची पोस्ट शेअर करुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

पुनीत राजकुमार यांची माहिती

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.