ज्युनिअर सिव्हील इंजीनियर भर्तीमध्ये 98.5 टक्के गुण मिळवत Sunny Leone टॉप; विभाग प्रमुख म्हणाले ही सनी कोण?
Sunny Leone Tops Bihar PHED Merit List for Civil Engineer Recruitment | (Photo credit: archived, edited, representative image)

बिहार (Bihar) राज्यात शिक्षण म्हटले की प्रत्येक वर्षी काहीतरी गोंधळ उडवून देणाऱ्या बातम्या समोर येतात. यंदाही बिहारमध्ये ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल भर्तीमध्ये अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) ही टॉपला असल्याचे पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांतून या प्रकारावर जोरदार चर्चा झाल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नीतीश कुमार सरकारमधील मंत्री व्ही एन झा यांनी म्हटले आहे की, बिहार सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (Public Health Engineering Department) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अद्याप प्रसिद्धच झाला नाही. तसेच, ज्या लोकांची नावे निकाल यादीत असतील त्यांना आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेतून पुढे जावे लागेल.

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (PHED)अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या 200 पदांसाठी अर्जदारांच्या यादित सनी लियॉन हे नाव टॉपला आहे. सांगितले जात आहे की, सनी लियोनीने या परिक्षेत 98.5 टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. संकेतस्थळावर तिचा अर्जक्रमांकही देण्यात आला आहे. तसेच, वडिलांचे नाव लियोना लियोनी असे देण्यात आले आहे. हा प्रकार पुढे येताच सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा, जे मला पटतं तेच मी करते: सनी लियोन)

Bihar PHED Merit List

दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकारावरुन जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर, बिहारमधील मंत्री झा यांनी म्हटले आहे की, अद्याप निकाल येणे बाकी आहे. ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर पदांसाठी सुमारे 17 हजार लोकांनी अर्ज केले होते. आम्ही अद्याप या सर्वांची नावे प्रकाशित केली नाहीत. जर काही त्रूटी असतील तर त्या दूर करुन ही नावे प्रसिद्ध केली जातील. अर्जदारांना भर्ती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे. काही अर्जदारांची नावे चुकीची अलेली असू शकतात. पण, प्रत्यक्ष भर्तीवेळी गुणपत्रिका आणि इतर तपशील पाहिल्यानंतर त्रूटी दूर होतील असेही मंत्री महोदयांनी म्हटले आहे. दरम्यान, या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग प्रमुखांनी म्हटले आहे की, कोणीतरी चुकीच्या पद्धतीने नाव दाखल केले असावे. मलाही माहिती नाही की, सनी लियोनी कोण आहे. लवकरच ही त्रूटी दूर केली जाईल.