मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सबा हारून खान यांनी हिजाबबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. हिजाब हा केवळ धार्मिक पेहराव नसून ती आमची अस्मिता आणि सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी उत्तर भारतीय संस्कृती आणि इतर जाती-धर्मांमधील परंपरांचा दाखला दिला आहे.
सबा खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "हिजाब हा आमचा सन्मान आहे. ज्याप्रमाणे तुम्ही उत्तर भारतात पाहता, तिथेही महिला आपल्या ओढणीने (दुपट्टा) अर्धा चेहरा झाकतात. ही त्यांची परंपरा आणि सन्मान आहे. त्याचप्रमाणे हिजाब हा आमचा सन्मान असून आम्ही मुस्लीम आहोत हे त्यातून दिसून येते."
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, डोके झाकण्याची किंवा पदर घेण्याची पद्धत केवळ मुस्लीम धर्मापुरती मर्यादित नाही. "केवळ आम्हीच नाही, तर इतर जाती-धर्माचे लोकही आदरापोटी आपले डोके झाकतात," असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कोण आहेत सबा हारून खान?
Who is Saba Haroon Khan: सबा हारून खान या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सक्रिय नेत्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 2026 च्या मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 64 मधून विजय मिळवला आहे. त्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हारून खान यांच्या कन्या आहेत. हारून खान हे शिवसेना (UBT) कडून निवडून आलेले गेल्या २५ वर्षांतील पहिले मुस्लिम आमदार ठरले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सबा खान यांनी आता स्थानिक राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे.
Saba Haroon Khan Election Result: वर्सोवा येथील ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांची कन्या सबा हारून खान यांनी प्रभाग क्रमांक 64 मधून 3768 मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या सरिता राजपुरे यांचा पराभव केला. राजपुरे यांना 6406 मते मिळाली. हारून खान हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते अनेक वर्षे शाखाप्रमुख होते.
सामाजिक आणि धार्मिक ओळख
हिजाबच्या मुद्द्यावरून देशात सातत्याने चर्चा होत असताना सबा खान यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. हिजाबकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा केवळ धार्मिक न ठेवता तो सांस्कृतिक अस्मितेचा भाग म्हणून पाहिला जावा, असा सूर त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. कोणत्याही व्यक्तीचा पेहराव हा त्यांच्या धर्माची आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
गेल्या काही काळापासून शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावरून विविध स्तरांवरून मते मांडली जात आहेत. शिवसेना (यूबीटी) नेत्या सबा खान यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना सर्वसमावेशक उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.