मुंबई: हिंदू धर्मात गणपती बाप्पाला 'प्रथम पूजनीय' आणि 'विघ्नहर्ता' मानले जाते. वर्षातून दोन वेळा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो—एक भाद्रपद महिन्यात आणि दुसरा माघ महिन्यात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला 'गणेश जयंती' किंवा 'माघी गणेशोत्सव' म्हटले जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' किंवा 'वरद चतुर्थी' असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी गणेशाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 10000 पटीने अधिक कार्यरत असते. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या पोटी गणरायाने 'महोत्कट विनायक' अवतारात याच दिवशी जन्म घेतला होता. हा अवतार त्यांनी देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी घेतला होता.
गणेशोत्सव 2026 मधील तिथी आणि शुभ मुहूर्त
यंदा म्हणजेच 2026 मध्ये, माघी गणेश जयंती गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.
चतुर्थी तिथी प्रारंभ: 22 जानेवारी 2026, पहाटे 2:47 पासून.
चतुर्थी तिथी समाप्ती: 23 जानेवारी 2026, पहाटे 2:28 पर्यंत.
पूजेचा शुभ मुहूर्त: सकाळी 11:29 ते दुपारी 2:37 पर्यंत
गणेश जयंती 2026 मराठी शुभेच्छा
विद्याविनायकाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो, माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया! माघी गणेश जयंतीनिमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना.

ॐ गं गणपतये नमः! माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वावर बाप्पाचे आगमन आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो.

बाप्पाचा आशिर्वाद, सुखाची पहाट! माघी गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
गणेश जयंती निमित्त सुख-समृद्धीचे आगमन होवो आणि संकटांचे निवारण होवो. शुभेच्छा!

मोरया रे! माघी गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
गणेश जयंती पूजा विधी आणि नैवेद्य
भाद्रपदातील गणपती हा 'पार्थिव' (मातीचा) असतो, तर माघी गणपती हा प्रामुख्याने 'जन्मोत्सव' म्हणून साजरा होतो. 1. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे (स्नानाच्या पाण्यात तीळ घालणे शुभ मानले जाते). 2. बाप्पाची मूर्ती किंवा तसबीर स्थापित करून तिला हळद-कुंकू, अक्षता आणि लाल फुले अर्पण करावीत. 3. बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. 4. नैवेद्यासाठी या दिवशी तिळाच्या लाडूंचा किंवा तिळगुळाच्या मोदकांचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसांत तीळ आरोग्यासाठीही उत्तम असतात.
गणेश जयंतीचे विशेष फळ
अग्नि पुराणात सांगितल्यानुसार, जो व्यक्ती या दिवशी मनोभावे व्रत करतो आणि बाप्पाची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. करिअर किंवा व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी 'गणपती अथर्वशीर्ष' किंवा 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते.