मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) काँग्रेसने (Congress) महागाईच्या मुद्द्यावर सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने केली. विशेष बाब म्हणजे शुक्रवारी झालेल्या निदर्शनावेळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याऐवजी काँग्रेस नेत्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या पुतळ्याचे दहन केले. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर या कलाकारांच्या मौनावर काँग्रेसने सवाल केला. भोपाळमधील शिवाजी नगर बसस्थानकावर माजी मंत्री आणि आमदार पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी जमले.
यावेळी पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शने केली गेली. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या मौनावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन्ही कलाकारांचे पुतळे जाळून घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते 'अमिताभ जी काही बोला, तोंड उघडा' अशा घोषणा देताना दिसले.
माजी मंत्री पीसी शर्मा म्हणाले की, 'यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेव्हा पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्या होत्या, तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप टोमणे मारायचे. आता भाजप सरकारमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात ऐतिहासिक वाढ झाल्याने गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे, मात्र या दोन्ही कलाकारांनी मौन बाळगले आहे. महागाईच्या विरोधात त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही.’ (हेही वाचा: आता 'या' बँकेचे ग्राहक 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू शकणार नाहीत; RBI ने घातली बंदी)
या निदर्शनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलाश मिश्रा यांचाही प्रामुख्याने सहभाग होता. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ‘पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत लोक आता गाडी रोखीने घेतील आणि कर्ज घेऊन पेट्रोल खरेदी करावे लागेल, असे दिसते.’ त्यानंतर त्यावेळी अक्षय कुमारनेही सायकलवरून प्रवास सुरू केला होता. परंतु आता हे दोघेही महागाईविरोधात काहीही ट्विट करत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी या दोन्ही कलाकारांविरोधात संताप व्यक्त केला आहे.