Kangana Ranaut हिच्या सोशल मीडियातील पोस्ट सेन्सॉर करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत केली मागणी
कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) हिच्या विरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार याचिका दाखल करत देशातील कायदे व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी तिच्या सर्व सोशल मीडियातील पोस्ट भविष्यात सेन्सॉर कराव्यात अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी असे म्हणणाऱ्या कंगनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात वकील सरदार चरणजीत सिंह यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, कंगनाच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी मिळाल्यानंतरच पब्लिश करावी. सिंह यांनी असे ही म्हटले की, FIR ही खार पोलीस स्थानकात ट्रान्सफर व्हावा आणि 6 महिन्याच्या आतमध्ये तपास ही पूर्ण करावा. खरंतर कृषी कायदे मागे घेतल्यानंतर रनौत हिने शीख समुदायाबद्दल एक वादग्रस्त टीप्पणी केली होती. त्यानंतरच तिच्या विरोधात काही तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या. तसेच दिल्ली विधानसभेच्या एका समितीने सुद्धा तिला समन्स धाडले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अकाली नेते मनजिंदर सिंह सिरसा यांच्या नेतृत्वाखाली शीख समुदायातील एक डेलीगेशनने कंगना रनौत हिच्या विरोधात तक्रार दाखल करत सोमवारी खार पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली. त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सुद्धा भेट घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.(शीख समाजाबद्दल टिप्पणी केल्याने दिल्ली विधानसभेच्या शांति-सद्भाव समितीकडून Kangana Ranaut हिला समन्स)

दुसऱ्या बाजूला कंगनाने मंगळवारी असे म्हटले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन जी तिने टीप्पणी करत जी पोस्ट केली त्यामुळे तिला धमकी मिळाल्यानंतर तिने एफआयआर दाखल केला. रनौत हिने इंस्टाग्रामवर हिंदी भाषेत मोठी पोस्ट केली असून आरोप केला की, नुकत्याच करण्यात आलेल्या पोस्टमुळे सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत.

तर बठिंडा येथील एका व्यक्तीने तिला खुलेपणाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कंगनाने म्हटले आहे. परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही असे तिने प्रतिउत्तर केले आहे. पुढे रनौत हिने म्हटले की, मी देशाच्या विरोधात कट रचणाऱ्या आणि दहशतवादी ताकदींबद्दल बोलणे सुरुच ठेवणार.