Gulzar Birthday Special: गुलजार यांच्या 'या' गाण्याला आर.डी.बर्मननी नकार दिल्यावर, आशा भोसले यांनी बनवली चाल; 'असे' तयार झाले अनेक पुरस्कारप्राप्त गीत
ulzar (Photo Credits: Instagram)

Gulzar Birthday Special: भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या अनमोल रत्नांपैकी एक म्हणजे गुलजार (Gulzar). गीतकार, कवी, दिग्दर्शक गुलजार साहेब! 18 ऑगस्ट 1934 साली पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या गुलजार यांचा आज जन्मदिवस. गुलजार यांनी त्यांच्या गीतांमधून प्रत्येक भावन, व्यथा, आनंद, करुणा अगदी सोप्या शब्दांत मांडलेली आहे. त्यांची जवळजवळ सर्वच गाणी लोकप्रिय झाली मात्र त्यांच्याच दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'मेरा कुछ सामान... ' (Mera Kuch Samaan) ने इतिहास घडवला. 1887 साली इजाज़त (Ijaazat) प्रदर्शित झाला होता. रेखा, नसरुद्दिन शहा, अनुराधा पटेल, आरडी बर्मन, आशाजी आणि गुलजार यांनी उच्च अभिरुचीसंपन्न कलाकृती प्रेक्षकांच्या समोर ठेवली होती. या चित्रपटामधील 'मेरा कुछ सामान..' हे गाणे आजही लोकांच्या मनाचा ठाव घेते.

...मी तर इथून निघून गेलीये पण माझ्या अजूनही काही गोष्टी आजही तुझ्या जवळ आहेत त्या मात्र मला परत कर. दोघे एकत्र होते, जुने अनेक क्षण मुठीत साठवून ठेवले होते, क्षणाच्या आठवणी कधी तयार झाल्या दोघांनाही समजले नाही. आता माया तिच्या हिश्याच्या आठवणी मागत असते. सुधाला कितीही त्रास होत असला तरी महेंद्र मायला तिच्या या गोष्टी कधीच परत करू शकणार नसतो. इथे तिघेही दुःखी आहेत मात्र दोष कुणाचाच नाही. त्या आठवणींवरील मायाचा हक्क महेंद्र कागदावरील शब्दांवाटे वाचत राहतो आणि इथेच जन्म होतो एका नितांत सुंदर गीताचा... ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं...’

पंचम दा, गुलजार साहेब आणि आशाजी इजाज़तच्या गाण्यांवर काम करीत होते, एके दिवशी सकाळी गुलजार साहेब मोठ्या खुशीत कागदावर लिहिलेले काही बोल घेऊन पंचमदांसमोर उभे राहिले. पंचमदांनी कागद डोळ्यासमोर धरला आणि काही सेकंदामध्येच ते भडकले “उद्या तू मला टाईम्स ऑफ इंडियाचे फ्रंट पेज आणून देशील आणि म्हणशील चाल लावा, कसे शक्य आहे हे?” असे म्हणून त्यांनी त्या कागदाचा बोळा करून फेकून दिला. आशाजी तिथेच होत्या त्यांनी सहज तो कागद हातात घेतला आणि जशी एक कविता म्हणतो तसे गुणगुणू लागल्या ‘मेरा कुछ् समान तुम्हारे पास पडा हैं...’ पंचमदांनी त्यांना तिथे अडवले आणि आशाजी ज्या पद्धतीने वाचत होत्या त्याच पद्धतीने परत वाचावयास सांगितले. आशाजी घाबरल्या, म्हणाल्या “मी तर सहज गुणगुणत होते”. मात्र पंचमदांनी आशाजींकडून परत त्या ओळी गाऊन घेतल्या आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये हे गाणे तयार झाले. भलेही पंचमदांना गाण्याचे शब्द व्यवस्थित समजले नसतील मात्र त्यांनी गुलजार साहेबांच्या या गीताला जो न्याय दिला तो वाखाणण्याजोगा आहे. आणि पुढे आशाजींना ‘उत्कृष्ट गायिका’ आणि गुलजार साहेबांना ‘उत्कृष्ट गीतकाराचा’ तसेच 'उत्कृष्ट गीताचा' पुरस्कार मिळवून देऊन या गाण्याने इतिहास घडवला. (हेही वाचा: तब्बल १४ वर्षांच्या प्रक्रियेनंतर पडद्यावर अवतरला... पाकीजा !)

हे गाणे म्हणजे मुक्तछंदामध्ये लिहिलेली एक कविता आहे. प्रेयसी आपल्या प्रियकराकडे एकत्र व्यतीत केलेल्या क्षणाच्या आठवणी परत मागत आहे. ही कविता संपली तरी तिच्या स्वरांचे ध्वनी मागे उमटत राहतात. आणि आपल्या आठवणींच्या गर्भातून एक एक आठवण बाहेर पडत राहते. खरेतर अशी माया आपल्या सर्वांच्यामध्येच असते. प्रेम होते, एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात आणि काही समजायच्या आतच दोघांचे मार्ग वेगळे झालेले असतात. आपण कितीही चिडलो, ओरडलो, त्रास करून घेतला, समोरच्या बद्दलचा आदर नाहीसा झाला तरी प्रेम मात्र तसेच राहते… आठवणींच्या रूपाने ! हाथ सुटला म्हणून प्रेम संपत नाही आणि आठवणी? या आठवणीच तर त्या व्यक्तीला सदैव आपल्या काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवत असतात.