बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. अनेकजण त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करु लागले. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना आयसीयू (ICU) मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे त्यांचे फॅमेली फ्रेंड फैसल फारूकी (Faisal Farooqui) यांनी सांगितले.
पीटीआयशी (PTI) बोलताना फैसल फारूकी यांनी सांगितले की, दिलीप साहेबांची प्रकृती आता स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असा कुटुंबियांना विश्वास आहे.
30 जून रोजी दिलीप कुमार यांना मुंबई मधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापूर्वी देखील श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ते काही दिवस रुग्णालयात होते. मात्र प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.
दिलीप कुमार 98 वर्षांचे असून त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना स्वास्थ्य विषयी समस्यांमुळे किंवा रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात जावे लागते. या संपूर्ण काळात अभिनेत्री आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो या उत्तम साथ देत असल्याचे पाहायला मिळते. तसंच अनेकदा त्या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांना करतात. (Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी Saira Bano ने मानले चाहत्यांचे आभार, See Pics)
दरम्यान, दिलीप कुमार यांनी 50 वर्ष सिनेसृष्टीत काम केले आहे. या काळात त्यांनी तब्बल 65 सिनेमे केले. त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.