Dilip Kumar Hospitalized: जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल
Dilip Kumar | (Photo Credits: ANI/ Twitter)

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना मुंबई (Mumbai) मधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital) आज पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आज (बुधवार, 30 जून) पुन्हा एकदा नियमित चेकअप साठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना Bilateral Pleural Effusion चे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना आयसीयू (ICU) वॉर्डमध्ये ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्यानंतर 11  जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीच्या अपडेट्स त्यांच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात येतात. (अभिनेते दिलीप कुमार Ventilator वर नसून Oxygen Support वर; अद्यापही काही टेस्ट रिपोर्ट्स बाकी : Pulmonologist Dr Jalil Parkar यांची माहिती)

98 वर्षीय दिलीप कुमार मागील काही काळापासून आरोग्य संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा रुटीन चेकअप आणि इतर वैद्यकीय चिकित्सेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. दरम्यान, या संपूर्ण काळात अभिनेत्री आणि पत्नी सायरा बानो या कायम सोबत असतात. मागील वेळी त्यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारल्यानंतर चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानले होते.

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या सिनेसृष्टीतील 50 वर्षांच्या करियरमध्ये 65 सिनेमात काम केले आहे. सिनेमा क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच त्यांना 1994 साली दादासाहेब फाळके पुरस्कारनेही गौरविण्यात आले होते.