Celebrity Hacker Hot List 2024: आजकाल सायबर घोटाळ्यांचे (Cyber Scams) प्रमाण फार वाढले आहे. यामुळे लोकांचे कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत आहे. आता नुकतेच सिक्युरिटी सॉफ्टवेअर मेकर मॅकॅफीने (McAfee) सेलिब्रिटी हॅकर हॉट लिस्ट 2024 जारी केली आहे. या यादीत अशा स्टार्सची नावे देण्यात आली आहेत, ज्यांच्या नावावर सर्वाधिक ऑनलाइन घोटाळे होतात. या यादीत दिलजीत दोसांझ, आलिया भट्ट, विराट कोहली आणि ऑरी यांच्या नावांचा समावेश आहे. या सेलिब्रिटींशी संबंधित सर्च रिझल्ट सर्वात जोखमीचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. अभ्यासात म्हटले आहे की, सेलिब्रिटी जेवढे जास्त व्हायरल होतात, तितके त्यांच्या नावावर सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते.
या सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये लोकांची वैयक्तिक माहिती चोरली जाते आणि नंतर पैसे चोरले जातात. या यादीत ओरहान अवतरामणी म्हणजेच ऑरीचे नाव अग्रस्थानी आहे. बॉलीवूड जगतात त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. ऑरीसारख्या सेलिब्रिटीबद्दल इंटरनेटवर फारशी माहिती नाही, ज्याचा फायदा घेऊन घोटाळेबाज लोकांना लक्ष्य करतात.
या यादीत दिलजीत दोसांझचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या त्याचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट टूर चर्चेत आहे. सायबर गुन्हेगार दिलजीतच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी एक बनावट तिकीट वेबसाइटही तयार केली आहे.
या यादीत आलिया भट्टचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. यानंतर घोटाळेबाज सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आमिर खान आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावाने लोकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Cyber Fraud Through Dating App: मुंबईत डेटिंग ॲपद्वारे 65 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून 1.30 कोटी रुपये लुबाडले)
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला मॅकॅफीने एका सर्वेक्षणात उघड केले होते की, 80 टक्के भारतीय एक वर्षापूर्वीच्या तुलनेत आता डीपफेकबद्दल अधिक चिंतित आहेत. तर 64 टक्के लोकांच्या मते एआयमुळे ऑनलाइन घोटाळे ओळखणे कठीण झाले आहे. 75 टक्के लोकांनी इंटरनेटवर डीपफेक सामग्री पाहिल्याचे मान्य केले. तर 38 टक्के लोकांनी कबूल केले की त्यांना डीपफेक घोटाळ्याचा सामना करावा लागला होता, तर 18 टक्के लोकांनी कबूल केले की ते अशा घोटाळ्याला बळी पडले आहेत.
अशी घ्या काळजी -
- सोशल मीडियावर फोटो आणि इतर तपशील शेअर करताना काळजी घ्या.
- मैफिलीची तिकिटे शोधत असताना, नेहमी विश्वसनीय स्त्रोतांकडील लिंकवर क्लिक करा.
- संशयास्पद फायली डाउनलोड करणे टाळा, कारण त्यात छुपे मालवेअर असू शकतात.
- अज्ञात वेबसाइटवर वैयक्तिक माहिती किंवा लॉगिन तपशील सामायिक करू नका.
- डीपफेक व्हिडिओंपासून सावध रहा.
- कोणत्याही वेबसाइटला भेट देताना, तिची URL नक्कीच तपासा.
- तुम्ही फसवणुकीला बळी पडल्यास ताबडतोब तुमच्या बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याला कळवा.