भारतीय लोकप्रिय कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया (Bhanu Athaiya) यांचे गुरुवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. भानु अथैया यांनी भारतासाठी पहिला अकादमी म्हणजेच ऑस्कर (Oscar) पुरस्कार जिंकला होता. भानू अथैया यांची मुलगी राधिका यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. आज सकाळी झोपेतच त्यांचे निधन झाले. राधिका यांनी पुढे सांगितले, ‘भानू अथैया यांना हलका ताप आणि खोकला आला होता तसेच त्या Antibiotics घेत होत्या. त्यांना एक प्रकारच्या न्यूमोनियाने ग्रासले होते.
Richard Attenborough दिग्दर्शित 'गांधी' चित्रपटासाठी भानु अथैया यांना 1982 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कॉस्च्युम डिझायनर म्हणून 100 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम करणाऱ्या भानु अथैया यांचा जन्म 28 एप्रिल 1929 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय आहे. 1952 मध्ये गुरुदत्त यांचा चित्रपट ‘सीआयडी’मध्ये कॉस्च्युम डिझाईनर म्हणून त्यांनी पहिल्यांदा काम केले. या काळात त्यांनी प्यासा, साहब बिवी और गुलाम, हेरा फेरी आणि श्री नटवरलाल अशा चित्रपटांसाठी काम केले.
पीटीआय ट्वीट -
Costume designer Bhanu Athaiya, India's first Oscar winner, dies after prolonged illness, says her daughter
— Press Trust of India (@PTI_News) October 15, 2020
1983 मध्ये 'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकण्याबरोबरच, भानु अथैया यांना ऑस्करमध्ये नामांकित होणार्या विविध चित्रपटांना मत देण्याचे अधिकारही मिळाले. त्यानंतर त्यांनी राम तेरी गंगा मैली, हीरो हिरालाल, अग्निपथ, चांदनी, लगान आणि स्वदेश यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी काम केले. 1991 मध्ये गुलजार दिग्दर्शित 'लेकीन’ या चित्रपटासाठी आणि 2003 मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' या चित्रपटासाठी भानु अथैया यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (हेही वाचा: पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाली)
सुमारे, 67 वर्षे भारतीय सिनेमात काम करणाऱ्या भानू यांचे लग्न हिंदी चित्रपटातील कवी आणि गीतकार सत्येंद्र अथैया यांच्याशी झाले. या दोघांना एक मुलगी आहे. 2012 मध्ये भानु अथैया यांनी जिंकलेला ऑस्कर परत करण्याची घोषणा केली. त्यांचा असा विश्वास होता की, त्यांचे कुटुंब आणि भारत सरकार हा अमूल्य पुरस्कार टिकवून ठेवू शकले नाहीत, म्हणूनच हा पुरस्कार अॅकॅडमी संग्रहालयात सर्वात सुरक्षित आणि जपून ठेवला जाईल.