पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाली
Mayuri Deshmukh | (Photo Credits: Instagram)

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakre) याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. नैराश्याचा सामना करत असलेल्या आशुतोषने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबियांसह प्रेक्षकवर्गही हादरुन गेला. स्वाभाविकच पत्नी, अभिनेत्री मयुरी देशमुख हिला जबर धक्का बसला. त्यानंतर पहिल्यांदाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती आपली जीवलग मैत्रिण श्वेता हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि त्याचबरोबर तिचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करत आहे.

"माझ्याकडून आणि आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आशूला फार व्यक्त होणं जमत नसे त्यामुळे तुझं आमच्या आयुष्यात असणं किती मोलाचं आहे. हे त्याने तुला कधीच सांगितल नसेल. विशेषत: गेल्या वर्षभरात तुझी साथ महत्त्वाची ठरली. तु माझी बेस्ट फ्रेंड असूनही आशूला जज न करता समजून घेतलंस. नैराश्यासोबतच्या आमच्या प्रवासात तु नेहमीच आमच्या सोबत होती. तू एक रॉक सॉलिड पिलर नव्हतीस तर प्रवासातील महत्त्वाचा घटक होतीस," असे मयुरी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

पुढे ती म्हणते, "तुझ्याशिवाय आम्ही हे अनेक टप्पे कसे पार केले असते काय माहित? दुरून उपदेश न करता मैदानात उतरुन तू आमच्यासोबत हा लढा लढलीस. तु मैत्रीचा अर्थ पुन्हा नव्या दाखवून दिलास. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आली आहेस. तुझ्या अशा लहान मोठ्या कृतीतूनच आमचा प्रवास सुसह्य झाला. मला माहित आहे, आपल्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. याचं दु:ख आमच्या इतकंच तुलाही आहे. पण मी हा व्हिडिओ करतेय कारण आपल्या भावना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे खरे हिरो ओळखणं. ती तू आहेस श्वेता. एखाद्याचा त्रास समजून घेऊन त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तुझी जी वृत्ती आहे, ही खूप महत्त्वाची आहे. याची मला आणि आशूला खूप मदत झाली. म्हणून आपल्या अपयशामुळे हताश होऊ नको. जगाला तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे. त्यामुळे तू आहेस तशीच रहा. लोकांना मदत कर. त्या मदतीचे मोल आम्हाला ठाऊक आहे. मी अशी प्रार्थना करते की, आम्हाली जशी तू मदत केलीस तशी अडचणी असलेल्या प्रत्येकाला मदत मिळो. तु अद्वितीय आहेस श्वेता. तुझ्यासारखी मैत्रिण मला लाभली याचा आशूला प्रचंड अभिमान होता."

मयुरी देशमुख हिचा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

अभिनेता आशुतोष भाकरे याने 29 जुलै रोजी नांदेड मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आशुतोषच्या बर्थडे निमित्त छानसा केक बनवून मयुरीने एक भावूक पोस्ट त्याच्यासाठी लिहिली होती. (अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या दिवंगत पती आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट करुन अश्रूंना वाट केली मोकळी; पाहा भावनिक पोस्ट)

‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुख हिचा 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष भाकरे या अभिनेत्यासह विवाह झाला होता. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर लॉकडाऊनपूर्वी मयुरीचे 'तिसरे बादशाह हम' हे नाटक रंगभूमीवर सुरु होते.