Asha Bhosle Birthday Special: सुरांची सम्राज्ञी आशा भोसले; जाणून घ्या त्यांचे विश्वविक्रम, पुरस्कार व काही रंजक माहिती
आशा भोसले (फोटो सौजन्य-File Image)

भारतामध्ये फार कमी गायक असे आहेत ज्यांचे वय वाढत असते मात्र आवाजात काहीच फरक पडत नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांनी गाणी गायली तरी त्यांची गाणी एव्हरग्रीनच भासतात. यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो अशा भोसले (Asha Bhosle) यांचा. 1943 ते 2019 पर्यंत आशाजींनी हजारो गाणी गायली. लता मंगेशकरसारख्या गायिकेची बहिण असूनही आपली स्वतःची शैली, ओळख निर्माण केली. आज अशा या महान गायिकेचा वाढदिवस. 8 सप्टेंबर 1933 साली मंगेशकर कुटुंबामध्ये सांगली येथे आशा भोसले यांचा जन्म झाला. घरात त्यांचे वडिलच त्यांच्या गायनाचे गुरु होते. मात्र फसलेल्या पहिल्या लग्नाचे दुःख त्यांचे वाट्याला आले. त्यातूनही बाहेर पडून त्यांनी त्या काळी जिद्दीने नवीन सुरुवात केली आणि आज भारतातच नाही तर जगात नाव कमावले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया त्यांना मिळालेले पुरस्कार, विश्वविक्रम आणि त्यांचे यश

 • वयाच्या 16 व्या वर्षी 1949 साली ‘रात की राणी’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे गायले. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी..’ या गाण्यामुळे.
 • त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. गेल्या सहा दशकांमध्ये त्यांनी 12 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत.
 • 2011 मध्ये आशा भोसले यांचे नाव सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवण्यात आले. त्यांनी 2011 पर्यंत 20 भाषांमध्ये तब्बल 11 हजार गाणी रेकॉर्ड केली होती.
 • आशा भोसले या उडत्या चालीची गाणी गाण्यासाठी प्रसिद्ध होत्या मात्र त्यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा गझल गायनासाठी (चित्रपट- उमराव जान) मिळाला होता.
 • गुलजार यांच्या इजाजत चित्रपटामधील ‘मेरा कुछ सामान...’ या प्रसिद्ध गीताची चालही अपघाताने आशा भोसले यांनीच तयार केली होती. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
 • 1913 साली ‘माई’ या चित्रपटामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
 • आशा भोसले यांना 1997 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्या ‘लेगसी’ (Legacy) या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
 • आशा भोसले यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये तब्बल 9 फिल्मफेअर आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.
 • सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार तब्बल 18 वेळा प्राप्त करून त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
 • याशिवाय दादासाहेब फाळके पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, पद्मविभूषण, डॉक्टरेट अशा कैक इतर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे.

  (हेही वाचा: गुलजार यांच्या 'या' गाण्याला आर.डी.बर्मननी नकार दिल्यावर, आशा भोसले यांनी बनवली चाल; 'असे' तयार झाले अनेक पुरस्कारप्राप्त गीत)

तर अशाप्रकारे आशा भोसले अजूनही चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये जवळजवळ सर्व मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 1980 साली त्यांनी पंचम दा म्हणजेच आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केले. गुलजार, पंचम दा आणि आशा भोसले हे त्रिकुट एकेकाळी यशाच्या उच्च शिखरावर होते.