MOVIE THEATRE | (PICTURE COURTESY: INSTAGRAM)

नुकताच रिलीज झालेला 'वॉर', तसेच काही महिन्यापूर्वी आलेला 'कबीर सिंग' हे हिट झाले आणि मासेसचा मुद्दा पुन्हा प्रकाशात आला आहे. आपल्याकडे मासेस विरुद्ध क्लासेस हा वाद फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. ठराविक प्रकारचे चित्रपट, ठराविक प्रकारची गाणी, दिग्दर्शक, अभिनेते, गायक, संगीतकार इ . लोकांवर असे मासेस साठी काम करणारे म्हणून शिक्का लागला, की अशा लोकांना त्यांच्या कामाचं पुरेसं 'क्रेडिट' मिळत नाही.

ह्या सर्व मांदियाळीमध्ये जी नावं घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, ती म्हणजे मिथुन चक्रवर्ती आणि डेव्हिड धवन. सुरवातीची काही वर्ष वेगळ्या धाटणीचे सिनेमे केल्यानंतर ह्या दोघांनाही पब्लिकची अभिरुची कळली. त्यांची नस सापडली. मिथुनचा प्रेक्षकवर्ग हा निमशहरी भागातला होता. त्यामुळे परिस्थितीने ग्रासलेला, पिचलेला, समाजाच्या ओझ्याखाली दबलेला हिरो जेव्हा ह्या प्रतिकुलते विरोधात बंड करतो तेव्हा ते त्याच्यामध्ये स्वतःला पाहू लागले. 'रॉबिनहूड' हि कन्सेप्टच अशी आहे, कि कुठल्याही काळात, समाजात, वर्गात तुम्ही न्या ती यशस्वी होतेच. दुसरीकडे डेव्हिड धवनने सर्व वर्गांसाठी सिनेमे बनवून सुद्धा कधीही तो क्लासेसचा दिग्दर्शक झाला नाही. त्याने आणि गोविंदाने तब्बल १७ चित्रपट केले. त्यांपैकी काहींचा अपवाद वगळता सर्व सिनेमे हिट होते. त्याच सिनेमे हे सिरिअसली पाहण्याचे नव्हतेच. पण त्याचमुळे त्याला सुद्धा तितकंसं सिरिअसली घेतलं गेलं नाही.

नदीम-श्रावण सारखी संगीतकार जोडगोळी, समीर हा गीतकार, अलका याग्निक- कुमार सानू सारखे गायक ह्या सर्व लोकांना कमी अधिक प्रमाणात ह्याच उपेक्षेला सामोरं जावं लागलं. हि झाली काही प्रातिनिधिक नावं. पण नीट अभ्यास केला तर लक्षात येईल कि नव्वदच्या दशकांमधल्या बऱ्याच सिनेमांना, दिग्दर्शकांना आणि सर्व कलाकारांना, त्यांचा हक्क असूनही, 'मासेस'साठी काम करणारे म्हणून कौतुकापासून दूर ठेवल्या गेलं.

गेल्या काही वर्षात चित्र बदललं आहे. अनुराग कश्यप, ,राजकुमार राव, आयुष्मान खुराणा ह्या लोकांनी मासेस आणि क्लासेस मधली हि कधीही न संपणारी दरी काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता काहीशी जबाबदारी पब्लिकही उचलेलंच. कारण शेवटी, 'ये पब्लिक है, ये सब जानती है...'