Hydrogen Car: देशातील पहिली हायड्रोजन कार झाली लाँच; एकदा टाकी भरली की धावणार तब्बल 650 किमी (Watch Video)
Toyota Mirai (संग्रहित संपादित प्रतिमा)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) सह पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, भारतातील पहिले ऑल-हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन मिराई (Mirai ) लाँच केले. टोयोटा मिराई ही जगातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) आहे आणि ती शुद्ध हायड्रोजनपासून निर्माण होणाऱ्या विजेवर चालते. याला शून्य-उत्सर्जन करणारे वाहन देखील मानले जाते, कारण कार टेलपाइपमधून केवळ पाणी उत्सर्जित करते.

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या हायड्रोजनवर चालणाऱ्या आधुनिक फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेईकलच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ झाला. संपूर्ण टाकी फुल केल्यानंतर ही कार तब्बल 650 किमी अंतर कापेल. लक्झरी वाहनांमध्ये हायड्रोजन कारचा समावेश होणार आहे. या पायलट प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, महेंद्र नाथ पांडे, आरके सिंग आणि टोयोटाचे अधिकारी उपस्थित होते.

ही कार कमी खर्चात चालवता येऊ शकते, असे नितीन गडकरी यांनी पायलट प्रोजेक्ट लॉन्चच्या निमित्ताने न्यूज18 हिंदीशी संवाद साधताना सांगितले. ते म्हणाले की, भविष्यात जेव्हा आपल्या देशात हायड्रोजन केंद्रे स्थापन होतील, तेव्हा ही गाडी एक रुपयात दोन कि.मी. पर्यंत चालेल. त्यांनी सांगितले की एक किग्रॅ. हायड्रोजनची किंमत सुमारे 1 डॉलर असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे सुमारे 70 रुपयांमध्ये 120 कि.मी. अंतर कापता येऊ शकते.

सध्या हायड्रोजन कारचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे, आता या दिशेने वेगाने काम होणार आहे. Toyota Kirloskar Motor ने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV Toyota Mirai चा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे, जो भारतीय रस्ते आणि हवामानात हायड्रोजनवर चालेल. टोयोटा मिराई असे त्याचे नाव आहे. हा देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असेल. (हेही वाचा: New Vehicle Rules: सरकारकडून वाहतूकीच्या 'या' नियमात बदल, 1 एप्रिल 2022 पासून होणार लागू)

ही गाडी डिसेंबर 2020 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आली. या कारमध्ये अवघ्या पाच मिनिटांत इंधन भरता येते, असा कंपनीचा दावा आहे. बॅटरीवर चालणार्‍या इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त, सरकार पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन उपाय म्हणून हायड्रोजन इंधन सेलचा विचार करत आहे.