आजकाल इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) ट्रेंड वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्या इव्ही सेगमेंटमध्ये नवनवीन गाड्या सादर करत आहेत. मात्र आता एका सर्वेक्षणात इव्हीबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. पार्क+ (Park+) ने अलीकडील सर्वेक्षणावर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात भारतातील इलेक्ट्रिक वाहन मालकांमध्ये आपल्या गाड्यांबद्दल लक्षणीय असंतोष दिसून आला आहे. सर्वेक्षणात दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमधील 500 ईव्ही कार मालकांच्या प्रतिसादांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्या व्ही मालकांपैकी 51 टक्के मालकांनी त्यांच्या पुढील खरेदीसाठी पेट्रोल/डीझेल वाहनांकडे परत जाण्यास प्राधान्य दिले.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात भारतात सुमारे 91,000 इलेक्ट्रिक प्रवासी वाहने विकली गेली.
सर्वेक्षण केलेल्या 88 टक्के इव्ही मालकांनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगशी संबंधित चिंता ही प्राथमिक चिंता म्हणून उद्धृत केली. विशेष म्हणजे, इव्ही चार्जिंगची चिंता अधिक सामान्यपणे चर्चेत असलेल्या ड्रायव्हिंग रेंजच्या चिंतांपेक्षा जास्त आहे. या आव्हानांमुळे अनेक ड्रायव्हर्सनी त्यांचा प्रवास 50 किमी पेक्षा कमी अंतराच्या छोट्या इंटरसिटी ट्रिपपर्यंत मर्यादित ठेवण्यास प्राधान्य दिले. याव्यतिरिक्त, सर्वेक्षणातील 73 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, इव्हीचा देखभाल खर्च हे चिंतेचे अजून एक प्रमुख क्षेत्र आहे. बऱ्याच इव्ही मालकांना हे समस्याप्रधान वाटते की, स्थानिक यांत्रिकींना इव्ही दुरुस्त करणे कठीण जाते. (हेही वाचा: New EV Charging Stations: इलेक्ट्रिक वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गावर उभारणार 5,833 नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स)
इलेक्ट्रिक वाहनाच्या पुनर्विक्री मूल्यातील लक्षणीय घट ही सर्वेक्षणातील 33 टक्के इव्ही मालकांसाठी चिंतेची बाब होती. अजूनही इव्हीचा पुनर्विक्रीचा बाजार विकसित होत आहे. अशात बॅटरीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित चाचण्यांच्या सध्याच्या अभावामुळे त्यांचे खरे मूल्य मोजणे कठीण होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बॅटरीची किंमत ईव्हीच्या किंमतीच्या 30 टक्के आहे. अशाप्रकारे सरासरी, इव्ही मालकांनी पेट्रोल अथवा डीझेल वाहन मालकांपेक्षा कमी समाधान नोंदवले.