Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

भारत सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) वापराला पाठींबा देत आहे. अशा वाहनांच्या खरेदीवर सबसिडीदेखील दिली जात आहे. सध्या देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेत आहेत. परंतु गेल्या काही महिनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा अपघातांमध्ये काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी याबाबत भाष्य करून कारवाईचा इशारा दिला.

ते म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी आम्ही तज्ञांची समिती स्थापन केली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘अहवालाच्या आधारे, आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांबाबत आवश्यक आदेश जारी करू. तसेच आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू. कोणत्याही कंपनीने त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास मोठा दंड आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील.’

ते म्हणाले, ‘कंपन्या वाहनांच्या सर्व दोषपूर्ण बॅच ताबडतोब परत मागवण्यासाठी आगाऊ कारवाई करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.’ (हेही वाचा:  पुन्हा एकदा Okinawa इलेक्ट्रिक स्कूटर लागली आग; यावेळी संपूर्ण शोरूम जळून खाक)

दरम्यान, नुकतेच तेलंगणातील निजामाबाद शहरात 80 वर्षीय वृद्धाचा ईव्हीमुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या PureEV इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी रात्रभर चार्जिंगमुळे फुटली. PureEV बॅटरीचा स्फोट होण्याची ही पाचवी घटना आहे. निजामाबाद शहरातील सुभाषनगर येथील बी रामास्वामी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामास्वामी यांचा मुलगा बी प्रकाश हा इलेक्ट्रिक दुचाकीचा मालक आहे. PureEV बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध स्थानिक पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304-A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.