Electric Scooter Fire: पुन्हा एकदा Okinawa इलेक्ट्रिक स्कूटर लागली आग; यावेळी संपूर्ण शोरूम जळून खाक
Okinawa Electric Bike (Photo Credits-Twitter)

इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग (Fire) लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला (Okinawa Electric Scooter) आग लागल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी आग एक-दोन स्कूटरला नाही तर संपूर्ण शोरूमला लागली आहे. प्रकरण तामिळनाडूचे आहे. तामिळनाडूमधील ओकिनावा ऑटोटेक डीलरशिपला आग लागली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूमधील इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ओकिनावा ऑटोटेकच्या डीलरशिपमध्ये अचानक आग लागली. या घटनेत संपूर्ण डीलरशिप जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आग सर्वात आधी स्कूटरमध्ये लागल्याचे सांगण्यात येत आहे. स्कूटरमधून निघणाऱ्या ठिणग्यांनी रौद्ररूप धारण केले व काही सेकंदात संपूर्ण डीलरशिप आगीच्या भक्षस्थानी पडली. ओकिनावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेली ही चौथी आग आहे.

या घटनेपूर्वी ओकिनावाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ओकिनावा ऑटोटेक म्हणते की, हे रिकॉल त्यांच्या चाचणी शिबिराचा एक भाग आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांशी संपर्क सुरू केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की गाडीमधील बॅटरी या लूज कनेक्टर किंवा इतर कोणत्याही कमतरतेसाठी तपासल्या जातील. ग्राहकांना संपूर्ण भारतातील कोणत्याही ओकिनावा डीलरशिपवर ही सेवा मोफत मिळू शकेल.

ओकिनावाने दोन दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी आपल्या प्रेझ प्रो स्कूटरच्या 3,215 युनिट्स परत मागवण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले आहे की बॅटरीशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते प्रेझ प्रो इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने आपल्या वाहनांसाठी रिकॉल जारी करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे. (हेही वाचा: Olectra Electric Truck: ई-बसनंतर आता ऑलेक्ट्रा घेऊन येणार भारतातला पहिला ईलेक्ट्रिक ट्रक)

सध्या भारतामध्ये उष्णतेने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशातील तापमान 40 अंशांपेक्षा जास्त वाढले आहे, अशा परिस्थितीत बॅटरीला आग लागण्याचा धोका वाढतो आणि यामुळेच कंपनीने रिकॉल जारी केले आहे. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात 6 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचे अहवालात समोर आले आहे, त्यापैकी नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावाची आहे. याशिवाय कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली असून त्यात 40 ईव्ही जळून खाक झाल्या आहेत.