सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या वाढत्या किंमती, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) प्राधान्य दिले जात आहे. आता पुण्याच्या रस्त्यावर ऑलेक्ट्राच्या (Olectra) 150 इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. पुण्यापूर्वी सुरत, मुंबई, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि डेहराडून येथे ऑलेक्ट्रा कंपनीच्या बसेस धावत आहेत. या इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील CO2 उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल. या बसेसनंतर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने शुक्रवारी इलेक्ट्रिक ट्रक विभागात विस्तार करण्याच्या त्यांच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, 6×4 हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकची (Olectra Electric Truck) यशस्वी चाचणी केली.
इलेक्ट्रिक बस उत्पादनातील अग्रणी ऑलेक्ट्राने आता ट्रक उत्पादनात प्रवेश केला आहे. एका चार्जवर 220 किमी अंतर कापणारे ऑलेक्ट्रा टिपर हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक आहे. हा ट्रक जड बोगी सस्पेन्शन ट्रिपरसोबत बनवलेला आहे, जो 25 टक्क्यांपेक्षा जास्त उंची किंवा उतार असलेल्या रस्त्यावर धावण्यास सक्षम आहे. हैदराबादच्या बाहेरील भागात अत्याधुनिक सुविधांसह या ट्रकचे उत्पादन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना, के.व्ही. प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड म्हणाले, ‘भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये अग्रणी म्हणून, ऑलेक्ट्राने आता हेवी-ड्युटी टिपर चाचण्या सुरू केल्या आहेत. भारतातील हा अशा प्रकारचा पहिला ट्रक आहे व हे सांगताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. (हेही वाचा: Ola आणि Okinawa नंतर आता Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; सरकारने दिले चौकशीचे आदेश)
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची स्थापना 2000 मध्ये झाली. 2015 मध्ये, ऑलेक्ट्राने भारतात इलेक्ट्रिक बसेस लाँच केल्या. या 100% इलेक्ट्रिक बसेस शून्य उत्सर्जनाच्या आहेत आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.