Ola आणि Okinawa नंतर आता Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Ola Electric Scooter (संग्रहित संपादित प्रतिमा)

इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लोकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्या स्कूटरच्या गुणवत्तेशी छेडछाड करत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. नुकतेच पुण्यातील लोहगाव येथे ओला इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro ला आग लागल्याची घटना घडली होती. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यामध्येही ओकिनावा (Okinawa) इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याने एक व्यक्ती आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. अशा घटनांबाबत सरकार गंभीर झाले आहे. या दोन्ही प्रकरणांच्या नंतर लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी सरकारने या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, जेणेकरून खरे कारण कळू शकेल.

केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या कारणाची चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने स्वतंत्र तज्ज्ञांच्या पथकाला दिले आहेत. मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमानी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ओला स्कूटरला लागलेल्या आगीची घटना सरकार गांभीर्याने घेत आहे. आता तंत्रज्ञान तज्ञ या घटनेची चौकशी करतील आणि लवकरच त्याचा अहवाल माध्यमांना दिला जाईल. ते पुढे म्हणाले की, सरकार आता वाहनांच्या सुरक्षेबाबत खूप काळजी घेत आहे.

ओला आणि ओकिनावा ऑटोटेकच्या इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) आग लागल्याच्या काही दिवसांनंतर, तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथून अशीच एक घटना समोर आली आहे. यावेळी, हैदराबाद स्टार्टअप Pure EV ने बनवलेली इलेक्ट्रिक स्कूटर आगीत भस्मसात झाली, ज्यामुळे EV च्या सुरक्षिततेबद्दल अजूनच चिंता निर्माण झाली आहे.

ओकिनावाच्या गाडीला लागलेल्या आगीबाबत तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्त्याने त्याच्या घराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या जुन्या चार्जिंग सॉकेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती. स्कूटर चार्ज होत असलेल्या जुन्या सॉकेटची पॉवर इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्होल्टेज क्षमतेपेक्षा कमी असल्याने इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. (हेही वाचा: पुण्यात Ola Electric Scooter ने अचानक घेतला पेट; कारण अस्पष्ट, कंपनीने दिले चौकशीचे आदेश)

ओकिनावा ऑटोटेकने याबाबत सांगितले की, आम्ही आमच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचे मानक ठेवतो. ही घटना वापरकर्त्याला इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग मार्गदर्शक तत्त्वांची आणि त्याच्या वापराबद्दल जागरूक करेल. वापरकर्त्याने चार्जिंग मार्गदर्शक तत्त्वे आणि चार्जर वापरण्याची योग्य पद्धत पाळली पाहिजे.