Bajaj Chetak 3201 Special Edition (Photo Credit: Amazon)

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरने (Bajaj Chetak Electric Scooter) अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत चांगली पकड मिळवली आहे. या स्कूटर्सना भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने बजाज चेतक 3201 चे स्पेशल एडिशन (Bajaj Chetak 3201 Special Edition) भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. ही स्कूटर कंपनीच्या इतर स्टँडर्ड स्कूटरच्या टॉप व्हेरियंटवर आधारित आहे. बजाज चेतक 3201 स्पेशल एडिशन स्कूटरची विक्री 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तुम्ही ही स्कूटर ई-कॉमर्स साइट Amazon India वरून देखील खरेदी करू शकता. ही स्कूटर बाजारात फक्त ब्रुकलिन ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

बजाज चेतकच्या या स्पेशल एडिशन स्कूटरमध्ये कंपनीने 3.2 kW चा बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीच्या मदतीने, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 136 किमीची रेंज देते. तसेच, या नवीन एडिशनमध्ये कंपनीने ताशी 73 किमीचा टॉप स्पीड दिला आहे.  हे सध्याच्या प्रीमियम मॉडेलच्या 127 किमीच्या रेंजपेक्षा जास्त आहे. ही गाडी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5.30 तास लागतात.

बजाज चेतक स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सवर नजर टाकल्यास, कंपनीने टीएफटी डिस्प्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, हिल-होल्ड कंट्रोल, म्युझिक कंट्रोलसह कॉल अलर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत. याशिवाय यामध्ये स्पोर्ट राइड मोड देखील उपलब्ध आहे. (हेही वाचा: Electric Vehicles: देशातील 50% पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांचे मालक आपल्या गाडीबाबत असमाधानी; पेट्रोल-डिझेल गाड्यांकडे वळण्याची योजना- Reports)

बजाज चेतकने आपल्या नवीन आवृत्तीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये ठेवली आहे. ही प्रास्ताविक किंमत आहे, जी नंतर 1.40 लाख रुपये होईल. बाजारात ही स्कूटर अथर रिझटा, ओला एस1 प्रो आणि टीव्हीएस आयक्यूब यांसारख्या स्कूटरलाही थेट टक्कर देऊ शकेल. ग्राहक या ई-स्कूटरची ऑनलाइन खरेदी पूर्ण करू शकतील आणि बाकीचे पेपर वर्क डीलरशिप करेल. बजाजने हे देखील जाहीर केले आहे की, चेतक प्रीमियम, चेतक अर्बन (3202) आणि नवीन चेतक 3201 स्पेशल एडिशन यांना अवजड उद्योग मंत्रालयाकडून (एमएचआय) इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) साठी मंजुरी मिळाली आहे. कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारत सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेचा देखील एक भाग आहे.