पाण्यावर चालणारी कार (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या पर्यावरण अनुकूल कार्सची (Environmentally Friendly Cars) बाजारपेठ मोठी होत आहे. भारत आणि इतर देशांतील ऑटोमोबाईल कंपन्यां प्रदूषण टाळण्यासाठी कोणत्या प्रकारच्या इंधनाचा वापर करता येईल याचा शोध घेता आहेत. यामध्ये इंधनचा खर्चही महत्वाचा आहे. अशात  मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील एका मेकॅनिकने स्वस्त इंधनावर चालणाऱ्या कारची निर्मिती केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या कारमधील इंधन हे पाणी आणि कार्बाइड पासून बनवण्यात आले आहे. मोहम्मद रईस मेहमुदी मरकानी असे या मेकॅनिकचे नाव आहे.

मोहम्मद गेली 35 वर्षे गॅरेजमध्ये काम करत आहेत, व गेले सहा महिने ते अशा प्रकारच्या इंधन निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या वर्कशॉपमध्ये केलेल्या अनेक प्रयोगानंतर मरकानी यांनी या इको फ्रेंडली कारची निर्मिती केली (त्यांनी त्यांच्या मारुती 800 गाडीवरच वेगवेगळे प्रयोग केले). याचे वैशिष्ठ्य म्हणजे या कारमधील इंधन हे फक्त 10 ते 20 रुपये प्रति लिटर इतके आहे. या इंधनावर ही कार 50 ते 60 किमी प्रतितास या वेगाने चालते. (हेही वाचा: अवघ्या 40 रुपयांत उपलब्ध होणार पेट्रोल? हैद्राबाद येथे होत आहे प्लास्टिकपासून इंधन निर्मिती)

ही कार अॅसिटिलीन गॅसवर चालते, जे कॅल्शियम कार्बाइड आणि पाणी यांदरम्यान घडवल्या गेलेल्या रासायनिक क्रियेपासून बनवले जाते. खनिजेसाठी वेल्डिंग आणि पोर्टेबल लाइटिंगसह अनेक औद्योगिक उद्दीष्टांसाठी या गॅसचा वापर केला जातो. याबाबत मरकानी म्हणतात, भारतीय बाजारात पेट्रोलवर 70 रुपये प्रति लिटर खर्च करणाऱ्या भारतीयांसाठी हे इंधन फार मोठी मदत असणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीत असणारे डिजिटल तंत्रज्ञान. ही गाडी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारेही ऑपरेट करू शकणार आहात.