आश्चर्यम! अवघ्या 40 रुपयांत उपलब्ध होणार पेट्रोल? हैद्राबाद येथे होत आहे प्लास्टिकपासून इंधन निर्मिती
प्लास्टिकपासून इंधन निर्मिती (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील पेट्रोलचे भाव (Petrol Price) गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी तर हे दर आवाक्याबाहेरचे झाले आहेत. अशात प्लास्टिक (Plastic) आणि त्याच्या वापरामुळे निर्माण होत असलेल्या प्रदूषणाचा धोका वाढत आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करून, हैदराबादच्या (Hyderabad) एका प्राध्यापकाने प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा प्रयोग केला आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. प्लास्टिक पासून तयार झालेल्या या पेट्रोलचा दर अवघा 40 रुपये प्रति लिटर इतका आहे.

हैद्राबाद येथील सतीश हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.  त्यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करण्यासाठी पायरोलिसिस या अनोख्या पद्धतीचा वापर केला. निर्वात पोकळीमध्ये म्हणजेच व्हॅक्युममध्ये प्लास्टिक गरम करून त्याचे विघटन केले जाते. या प्रक्रियेमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही. या विघटन प्रक्रियेमध्ये पेट्रोलची निर्मिती केली जाते. ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडते. यासाठी सतीश यांनी एका कंपनीचीही स्थापना केली आहे.

या प्रक्रियेमध्ये 500 किलो प्लास्टिकपासून 400 लिटर इंधन मिळू शकते. सतीश हे टाकावू पदार्थांपासून डिझेल, पेट्रोल आणि उड्डाण क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या इंधनाची निर्मिती करतात. गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी 50 टन प्लास्टिकचे इंधनात रुपांतर केले आहे. सध्या अवघ्या 40 ते 50 लिटर दराने या पेट्रोलची विक्री केले जात आहे. बेकरीवाले हे पेट्रोल त्यांच्या बॉयरलमध्ये वापरतात. मात्र अजून वाहनांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या नाहीत, लवकरच या चाचण्या पूर्ण होतील.