Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणू जगात वेगाने पसरत आहे. अवघ्या तीन महिन्यांत हा विषाणू 75 देशांमध्ये पसरला असून 18 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. पाच बाधितांचाही मृत्यू झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), या रोगाची सर्वाधिक प्रकरणे यूएस, यूके, कॅनडा आणि स्पेनमध्ये समोर येत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये आढळून आलेल्या संक्रमित रुग्णांपैकी 99 टक्के पुरुष आहेत, ज्यांचे इतर पुरुषांशी शारीरिक संबंध आहेत किंवा ज्यांचे एकापेक्षा जास्त सेक्स साथीदार आहेत.

अशा परिस्थितीत हा विषाणू देखील एचआयव्ही सारखा लैंगिक संक्रमित आजार असल्याची भीती व्यक्त होत आहे. यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख मंकीपॉक्सचा धोका असलेल्या पुरुषांना सध्या त्यांच्या लैंगिक साथीदारांना मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच पुरुषांना जास्त पार्टनरसोबत सेक्स न करण्यास सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Monkeypox: राजधानी दिल्ली पाठोपाठ केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन नवे रुग्ण)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली येथील मेडिसिन विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्रचल यांनी TV9 ला सांगितले की, समलिंगी पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे अधिक आढळली आहे,  परंतु हा विषाणू इतर अनेक मार्गांनीही पसरतो. मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाशी दीर्घकाळ संपर्क, त्वचेपासून त्वचेला स्पर्श करणे, संक्रमित प्राण्याशी संपर्क साधणे आणि संक्रमित रुग्णाची भांडी किंवा कपड्यांचा वापर करून देखील हा रोग पसरतो.

मंकीपॉक्स हा स्मॉलपॉक्स प्रमाणेच, हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो उंदीर आणि विशेषत: माकडांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. जर एखाद्या प्राण्याला या विषाणूची लागण झाली आणि माणूस त्याच्या संपर्कात आला तर त्यालाही माकडपॉक्स होण्याची शक्यता असते. संसर्गजन्य रोग तज्ञ आणि एचआयव्ही/एसटीडी (HIV/STD) सल्लागार डॉ ईश्वर गिलाडा म्हणतात, 'सध्या मंकीपॉक्सवर कोणताही परिपूर्ण उपचार नाही. स्मॉलपॉक्सची लस या रोगावर उपयुक्त ठरू शकते आणि मंकीपॉक्सच्या उपचारासाठी उपचारात्मक एजंट म्हणून काम करू शकते. याबाबत आपण कोणताही भेदभाव टाळून खबरदारी घेतली पाहिजे.'