UK हादरले; 8 बाळांचा खून व 10 जणांच्या मृत्यूचा कट रचल्याचा नर्सवर खळबळजनक आरोप, तिसऱ्यांदा झाली अटक 
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

सीरिअल किलिंगमुळे (Serial Killing) संपूर्ण देश हादरल्याच्या काही घटना याआधी समोर आल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेकांना पुण्यातील जोशी-अभ्यंकर प्रकरण अजूनही आठवत असेल. आता अशीच एक घटना युकेमधून (UK) समोर आली आहे. यूकेमधील 30 वर्षीय नर्स ल्युसी लेटबी (Lucy Letby) वर 8 नवजात बालकांचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, याव्यतिरिक्त ल्युसीवर अजून 10 मुलांच्या मर्डर अटेम्प्टचा आरोपही आहे. यापूर्वी ल्युसीला 17 मुलांचा मृत्यू आणि मृत्यूचा कट रचल्या प्रकरणी 2018 आणि 2019 मध्ये अटक करण्यात आली होती आणि आता नव्या आरोपांखाली तिला गुरुवारी जवळच्या वॉरिंग्टनमध्ये दंडाधिकारीांसमोर हजर केले गेले.

2015 ते 2016 च्या दरम्यान, चेस्टर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूंमध्ये दहा टक्के वाढ झाल्याचे दिसून आले होते. तपासणीत हे उघड झाले की ही मुले हृदय किंवा फुफ्फुसांच्या फेल्युअरमुळे मरत आहेत, ज्यांना पुन्हा ठीक करणे अशक्य होते. एका अहवालात असेही म्हटले होते की, या मृत मुलांच्या हात पायांवर विचित्र प्रकारचे पुरळ दिसून आले होते. मात्र या मुलांच्या मृत्यूचे कारण योग्यपणे समजू शकले नाही. नंतर रुग्णालयाने पोलिसांना याबाबत माहिती दिली व त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

2013 साली चेस्टर हॉस्पिटलच्या नवजात युनिटमध्ये केवळ 2 मुलांचा मृत्यू झाला होता, नंतर 2015 मध्ये ही संख्या 8 पर्यंत वाढली होती. पुढील वर्षी देखील या युनिटमध्ये 5 मुले मरण पावली. ल्युसी या युनिटमध्ये काम करायची, त्यामुळे तिच्यावरील संशय आणखीनच वाढला. त्यानुसार तिला 2018 व 2019 साली अटक केली गेली. त्यावेळी दोन दिवस तिची कसून चौकशीची झाली मात्र नंतर बेल मिळाल्यावर तिला सोडण्यात आले.

पोलिसांनी असे म्हटले आहे की त्यांनी 2018 मध्ये या प्रकरणात प्रथम ल्युसीला अटक केली. यानंतर काही काळानंतर तिला जामीनही मंजूर झाला. जून 2019 मध्ये पुन्हा एकदा ल्युसीला अटक करण्यात आली. आता पुन्हा एकदा लुसी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दुसरीकडे ल्युसीच्या मित्राचा असा विश्वास आहे की, ल्युसी हे कधीही करू शकत नाही. ती एक व्यावसायिक नर्स आहे आणि तिच्या या ड्रिम जॉबसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. (हेही वाचा: Cancer असल्याचे खोटे सांगून महिलेले जमवले तब्बल 45 हजार पाउंड; हॉटेलिंग, विमान प्रवास व जुगारावर उडवला पैसा)

चेस्टर युनिव्हर्सिटीमधून पदवी संपादन केलेली ल्युसी एकेकाळी 3 दशलक्ष डॉलर्सच्या फंडर मोहिमेचा एक भाग होती. तिने लिव्हरपूल महिला रुग्णालयातही काम केले आहे.